For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मसूद पजशकियान इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष

06:55 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मसूद पजशकियान इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष
Advertisement

कट्टरपंथी जलिली यांचा 30 लाख मतांनी पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान

इराणमध्ये मसूद पजशकियान हे देशाचे नववे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यांनी कट्टरतावादी नेते सईद जलिली यांचा 30 लाख मतांनी पराभव केला. इराणमध्ये शुक्रवारी (5 जुलै) दुसऱ्यांदा मतदान झाले. यामध्ये सुमारे 3 कोटी लोकांनी मतदान केले. इराणचे राज्य माध्यम ‘आयआरएनए’नुसार, मसूद पजशकियान यांना 1.64 कोटी मते मिळाली, तर जलिली यांना 1.36 कोटी मते मिळाली. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान हे डॉक्टर असण्यासोबतच कुराणही शिकवतात.

Advertisement

इब्राहिम रायसी यांचा 19 मे रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर देशात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीला इराणमध्ये 28 मे रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. यामध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेली 50 टक्के मते मिळवता आली नव्हती. त्यानंतर 5 जुलै रोजी 16 तास चाललेल्या मतदानात देशातील सुमारे 3 कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले होते. अधिकृत वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता मतदान संपणार होते. मात्र नंतर वेळ मध्यरात्री 12 पर्यंत वाढवण्यात आली.

पहिल्या टप्प्यातील मतदानात पजशकियान 42.5 टक्के मतांसह प्रथम आणि जलिली 38.8 टक्के मतांसह द्वितीय आले. इराणच्या संविधानानुसार, पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला बहुमत मिळाले नाही, तर पुढच्या फेरीतील मतदान पहिल्या 2 उमेदवारांमध्ये होते. यामध्ये बहुमत मिळवणारा उमेदवार देशाचा पुढील राष्ट्राध्यक्ष होतो. इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही स्पर्धकाला बहुमत न मिळाल्याने आता 5 जुलैला पुन्हा मतदान घेण्यात आले.

सहमतीसाठीचे प्रयत्न असफल

इराणचे राष्ट्राध्यक्ष सहमतीने निवडले जावेत यासाठी प्रयत्न करण्यात आले. प्राथमिक मतदानात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांमध्ये चर्चा घडवून आणली जाईल आणि त्यांच्यापैकी एकाला माघार घ्यावयास लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, 4 जुलैपर्यंत सहमती होऊ न शकल्याने मतदानाची पुढची फेरी घ्यावी लागली.

हिजाबचा मुद्दा प्रमुख

राष्ट्राध्यक्षपदासाठी ही निवडणूक इराणचे अध्यक्ष मोहम्मद रायसी यांच्या विमान अपघातातील मृत्यूमुळे घ्यावी लागली. या निवडणुकीत प्रारंभी 7 उमेदवार होते. मात्र, त्यांच्यापैकी तिघांनी माघार घेतली. तसेच हिजाबचा मुद्दा प्रचाराचे प्रमुख सूत्र बनला होता. याच मुद्द्यावर काही महिन्यांपूर्वी इराणमध्ये महिलांनी मोठे आंदोलन केले होते. तथापि, कालांतराने ते प्रशासनाने दडपून टाकले होते.

Advertisement
Tags :

.