पाकिस्तानसमोर कॅनडावर मोठ्या विजय मिळविण्याचे आव्हान
कॅनडा/ वृत्तसंस्था
न्यूयॉर्क
अमेरिकेने धक्का दिलेल्या आणि नंतर भारताकडून चीत झालेल्या पाकिस्तानला मंगळवारी येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या गटसाखळी सामन्यात कॅनडाचा सामना करावा लागणार आहे. मात्र सध्या पाकिस्तानकडे कमावण्यासारखे फारसे नाही आणि त्यांनी सर्व काही गमावल्यात जमा आहे. पाकिस्तानची सुपर एटसाठी पात्र ठरण्याची संधी आता कॅनडा आणि आयर्लंडविऊद्ध मोठा विजय मिळवण्यावर अवलंबून आहे. त्याशिवाय अमेरिकन संघ भारत आणि आयर्लंडकडून मोठ्या फरकाने पराभूत होईल, अशी आशा त्यांना बाळगावी लागेल.
त्या परिस्थितीतही दोन्ही संघांची गट स्तरावरील वाटचाल प्रत्येकी चार गुणांवर संपेल आणि कोणत्या संघाची निव्वळ धावसरासरी चांगली आहे हे लक्षात घेतले जाईल. त्यामुळे सर्वोत्तम परिस्थितीत देखील पाकिस्तान पात्र ठरेल की नाही याविषयी शाश्वती नाही. दोन विजयांनंतर अमेरिकेची 0.626 ची धावसरासरी चांगली आहे आणि आयर्लंडविऊद्ध फक्त एक विजय त्यांना पुरेसा आहे. तर उणे 0.150 अशी निराशाजनक धावसरासरी असलेल्या पाकिस्तानला फक्त जिंकण्याची गरज नाही, तर मोठ्या फरकाने जिंकणे अत्यावश्यक आहे. आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये 2009 चे विजेते कधी काळी ज्यासाठी विख्यात होते ती त्यांची मजबूत बाजू कधीही दिसलेली नाही.
बाबर आझमच्या नेतृत्वात स्पष्टता नसल्याचे दिसते. त्याशिवाय संघातील गटबाजी आणखी स्थिती बिघडवत आहे. पाक संघातील एक गट बाबरचा असून त्यात त्याचा मित्र मोहम्मद रिझवान आणि शादाब खान यांचा समावेश आहे, तर दुसरा गट अलीकडेच कर्णधारपदावरून उतरविलेल्या शाहीन शाह आफ्रिदीचा आहे. आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये त्यांचा एकही विभाग चमकलेला नाही आणि त्यांना पुढील फेरीसाठी पात्र ठरण्याची खूप धूसर अशी संधी मिळवायची असेल, तर उर्वरित सामन्यांमध्ये एकत्रित प्रयत्न करावे लागतील.
फखर जमान, इमाद वसिम, शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यासारख्या खेळाडूंनी खराब फटके खेळून पाकची स्थिती भारताविऊद्ध कठीण करून टाकली. त्यामुळे फलंदाजांची खराब कामगिरी हा पाकिस्तानसाठी मोठा चिंतेचा विषय आहे. भारताविरुद्ध नसिम शाह व मोहम्मद अमीर या गोलंदाजांची कामगिरी ही पाकिस्तानसाठी एकमेव चमकदार बाब राहिली. पण वेगवान गोलंदाज शाहीनला उरलेल्या दोन सामन्यांमध्ये अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. त्याला अनुकूल परिस्थितीत चेंडू स्विंग करता आलेला नाही.
दुसरीकडे, कॅनडा ‘अ’ गटात दोन सामन्यांतून एका विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेकडून सात गड्यांनी पराभूत झाल्यानंतर कॅनडाने त्यांच्या पुढच्या सामन्यात आयर्लंडला 12 धावांनी पराभूत करून उसळी घेतली. नवनीत धालीवाल हा त्यांचा वरच्या फळीतील अनुभवी फलंदाज आहे आणि त्याच्यावर बरेच काही अवलंबून राहील.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)