For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतासोबत व्यापार सुरू करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ

06:51 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतासोबत व्यापार सुरू करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ
Advertisement

2019 मध्ये पाकिस्ताननेच रोखला होता व्यापार : औषधांप्रकरणी पूर्णपणे भारतावर अवलंबून

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तान भारतासोबत व्यापारी संबंध पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. पाकिस्तानने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर भारतासोबतचा व्यापार एकतर्फी पद्धतीने रोखला होता.  पाकिस्तानचा व्यापारी समुदाय भारतासोबत व्यापार सुरू करण्यात यावा या मताचा आहे. यासंबंधी पाकिस्तान सरकार सर्व संबंधित घटकांशी सल्लामसलत करणार आहे. तसेच सर्व प्रस्तावांची समीक्षा केल्यावरच एखादा निर्णय घेतला जाणार असल्याचे पाकिस्तानचे विदेशमंत्री इशाक डार यांनी सांगितले आहे.

Advertisement

पाकिस्तानशी सध्या भारताचा व्यापार अत्यंत कमी प्रमाणात आहे. हा व्यापार केवळ सागरी मार्गाने होतोय. शेजारी देशाने केवळ भूमार्गाने होणारी आयात-निर्यात एकतर्फी पद्धतीने रोखली होती असे भारत सरकारने फेब्रुवारी महिन्यात स्पष्ट केले होते. यापूर्वी अटारी-वाघा सीमा आणि कराची बंदराच्या माध्यमातून व्यापार व्हायचा. आता भूमार्गाने कुठल्याही प्रकारचा व्यापार होत नाही. परंतु काही प्रमाणात सागरी आणि हवाईमार्गाने व्यापार आहे. पाकिस्तान अन्य आशियाई देशांच्या माध्यमातून भारतीय उत्पादने खरेदी करत असल्याची माहिती वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत दिली होती.

भारत-पाक संबंध बिघडले

भारत सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार केले होते. याच कलमाच्या अंतर्गत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता. हे कलम संपुष्टात आणल्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले होते. त्यावेळी इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते. जोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू केले जात नाही तोवर भारताशी कुठल्याही प्रकारची चर्चा केली जाणार नसल्याचे इम्रान यांनी म्हटले होते. तर भारताने दहशतवाद्यांवर कारवाई होत नाही तोवर चर्चेचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले होते. तेव्हापासून दोन्ही देशांदरम्यान थेट चर्चा झालेली नाही.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमकुवत

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाला सामोरा जात आहे. पाकिस्तानचा विदेशी चलन साठा सध्या 8 अब्ज डॉलर्सपेक्षाही कमी आहे. ही रक्कम सुमारे दीडी महिन्यांच्या आयातीला पुरेल इतकीच आहे. देशाकडे कमीतकमी 3 महिन्यांच्या आयातीचा खर्च करता येईल इतपत विदेशी चलन साठा असणे अपेक्षित असते. 2024 मध्ये पाकिस्तानचा जीडीपी केवळ 2.1 टक्क्यांच्या दराने वाढण्याची शक्यता आहे. सध्या एका डॉलरचे मूल 276 पाकिस्तानी रुपयांसमान आहे.

आयएमएफकडून निधीची अपेक्षा

घटत्या विदेशी चलन साठ्यादरम्यान पाकिस्तानला पुढील 2 महिन्यांमध्ये 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे. एकीकडे त्याच्यावर कर्ज फेडण्याचा दबाव आहे. तर दुसरीकडे 12 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफकडून त्याला 3 अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळण्याची कालमर्यादा देखील संपुष्टात येणार आहे. पाकिस्तानला कर्ज न मिळाल्यास तो दिवाळखोर घोषित होऊ शकतो.

Advertisement
Tags :

.