For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरप्रकरणी पाकिस्तानला मिळाली नाही इराणची साथ

06:30 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
काश्मीरप्रकरणी पाकिस्तानला मिळाली नाही इराणची साथ
Advertisement

पंतप्रधान शरीफांकडून गाझासोबत काश्मीरची तुलना : इराणच्या अध्यक्षांनी केले दुर्लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी पाकिस्तानला काश्मीर मुद्द्यावर साथ दिलेली नाही. रईसी हे 3 दिवसीय दौऱ्यानिमित्त सध्या पाकिस्तानात आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बैठकीदरम्यान रईसी यांच्यासमोर काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच काश्मीरची तुलना गाझासोबत केली होती. परंतु इराणच्या अध्यक्षांनी शाहबाज यांच्या वक्तव्याला कुठलाही प्रतिसाद देणे टाळले आहे.

Advertisement

रईसी यांनी स्वत:च्या संबोधनात केवळ पॅलेस्टाइनचा मुद्दा उपस्थित केला आहे. इराण पॅलेस्टिनींच्या हितासाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रईसी यांनी यावेळी काश्मीरचा कुठलाही उल्लेख केलेला नाही. काश्मीरप्रकरणी इराणच्या अध्यक्षांनी साधलेले मौन पाकिस्तानात शाहबाज शरीफ यांच्यासाठी अपमानास्पद ठरविले जात आहे.

इराणच्या अध्यक्षांच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान तेहरानमधील भारतीय दूतावासाने मंगळवारी वक्तव्य जारी केले आहे. भारत आणि इराणच्या संबंधांचा दीर्घ इतिहास राहिला आहे. दोन्ही देश व्यापार संपर्कव्यवस्था आणि अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी सातत्याने काम करत असल्याचे दूतावासाने नमूद केले आहे.

संबंध सुधारण्याची इच्छा

इराण अध्यक्षांच्या पाकिस्तान दौऱ्याचा मुख्य अजेंडा दोन्ही देशांमधील संबंध सुधारणे आहे. जानेवारी महिन्यात इराण आणि पाकिस्तानने परस्परांच्या भूभागात एअरस्ट्राइक केला होता. यामुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडले होते. या पार्श्वभूमीवरच इराणच्या अध्यक्षांनी पाकिस्तानचा दौरा करण्याचा निर्णय घेतला होता. द्विपक्षीय बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी दहशतवाद विरोधात मिळून काम करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. दोन्ही देश दहशतवादाच्या मुद्द्यावरून परस्परांवर आरोप करत असतात. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची सीमा इराणला लागून आहे. या भागात बलूच लिबरेशन आर्मी सक्रीय असून पाकिस्तानच्या सैन्यावर तिच्याकडून हल्ले केले जातात. तर बलुचिस्तानात जैश अल अदल ही संघटना सक्रीय असून तिच्याकडून इराणच्या सीमेत हल्ले करण्यात येतात.

Advertisement
Tags :

.