For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानची लंकेवर मात

06:45 AM Sep 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानची लंकेवर मात
Advertisement

आशिया चषकातील सुपर फोर लढतीत पाक 5 गड्यांनी विजयी

Advertisement

वृत्तसंस्था/ अबुधाबी

येथील शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या लढतीत पाकिस्तानने श्रीलंकेवर 5 गड्यांनी विजय मिळवला. सुपर फोरमधील पाकचा हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना लंकन संघाने 8 गडी गमावत 133 धावा केल्या. यानंतर पाकने विजयी लक्ष्य 18 षटकांतच पूर्ण केले. सलग दोन पराभवामुळे लंकन संघाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

Advertisement

प्रारंभी, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या कर्णधाराचा हा निर्णय चांगलाच फायद्यात पडला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या ओव्हरमधील दुसऱ्याच चेंडूवर कुसल मेंडिस भोपळा न फोडता माघारी परतला. त्यानंतर श्रीलंकेला 18 धावांवर पथुम निसंकाच्या रूपात दुसरा झटका बसला. निसंकाला 8 धावांवर शाहीन आफ्रिदीने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर श्रीलंकेच्या इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. कुसल परेरा 15, कर्णधार चरिथ असलंका 20, दासुन शनाका 0, वानिंदु हसरंगा 15, कमिंदू मेंडिसने 50 धावा करुन श्रीलंकेला 100 पार नेण्यात मोठे योगदान दिले. मेंडिसने 44 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारासह 50 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. यामुळे लंकन संघाला शतक गाठता आले. लंकन संघाने 20 षटकांत 8 गडी गमावत 133 धावा केल्या.

श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 134 धावांचा पाठलाग करताना पाकची सुरुवात चांगली झाली. साहिबजादा फरहान आणि फखर झमान यांनी 45 धावांची सलामी दिली. फरहानने 24 तर झमनने 17 धावा केल्या. यानंतर सईम आयुब आणि कर्णधार सलमान आगा स्वस्तात बाद झाले. यानंतर हुसेन तलत आणि मोहम्मद नवाज यांनी संघाला विजय मिळवून दिला. हुसेनने नाबाद 32 तर नवाजने नाबाद 38 धावांचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका 20 षटकांत 8 बाद 133 (कुसल परेरा 15, चरिथ असलंका 20, कमिंदू मेंडिस 50, वानिंदू हसरंगा 15, शाहिन आफ्रिदी 3 बळी, हॅरिस रौफ आणि हुसेन तलत 2 बळी, अब्रार अहमद 1 बळी), पाकिस्तान 18 षटकांत 5 बाद 138 (साहिबजादा फरहान 24, फखर झमान 17, हुसेन तलत नाबाद 32, मोहम्मद नवाज नाबाद 38, थिक्षाणा आणि हसरंगा प्रत्येकी 2 बळी).

Advertisement
Tags :

.