पहिल्याच वनडेत न्यूझीलंडकडून पाकचा धुव्वा
सामनावीर मार्क चॅपमनचे शतक, मिचेल, अब्बासची अर्धशतके : पाक 73 धावांनी पराभूत
वृत्तसंस्था/ नेपियर
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान टीमने टी 20 नंतर एकदिवसीय मालिकेतही पराभवाने सुरुवात केली आहे. नेपियरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 345 धावांचे आव्हान दिले होते मात्र पाकिस्तानला संपूर्ण 50 ओव्हरही खेळता आले नाही. न्यूझीलंडने पाकिस्तानला 44.1 ओव्हरमध्ये 271 रन्सवर ऑलआऊट करत हा सामना 73 धावांनी जिंकला. न्यूझीलंडने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. उभय संघातील दुसरा सामना दि. 2 रोजी हॅमिल्टन येथे होईल.
न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 50 षटकांत 345 धावांचे भले मोठे लक्ष्य ठेवले होते. परंतु, पाकिस्तानी संघ सर्वबाद 44.1 षटकात 271 धावाच करू शकला आणि त्यांना सामना गमवावा लागला. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 83 चेंडूंचा सामना करत 78 धावा केल्या. बाबरशिवाय सलमान आगाने देखील 58 धावांची खेळी केली. तर कर्णधार मोहम्मद रिझवानने 34 चेंडूत 30 धावा केल्या. पण हे खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. इतर पाक खेळाडूंनी मात्र निराशा केल्याने पाकला पहिल्याच वनडेत पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने पाकिस्तानचे एकूण 4 फलंदाज बाद केले. जेकब डफीने दोघांना तंबूचा रस्ता दाखवला.
मार्क चॉपमनचे शतक
तत्पूर्वी, या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. न्यूझीलंडची सुरवात फारशी चांगली झाली नाही. त्यांनी अवघ्या 50 धावांत 3 विकेट गमावल्या, तेव्हा पाकिस्तानचा निर्णय योग्यच होता, असे वाटत होते. पण, त्यानंतर मार्क चॅपमन आणि डॅरिल मिचेल यांच्यातील भागीदारीने सर्वांचे अंदाज चुकवले. या दोघांमधील 199 धावांची भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडची धावसंख्या 4 विकेट्स गामावत 349 धावांपर्यंत जाऊन पोहोचली. चॅपमनने 111 चेंडूत 13 चौकार व 6 षटकारासह 132 धावांची खेळी साकारली. मिचेलने 84 चेंडूत 76 तर मोहम्मद अब्बासने 26 चेंडूत 52 धावांचे योगदान दिले. पाककडून इरफान खानने 3 तर हॅरिस रौफ, अकिब जावेद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक :
न्यूझीलंड 50 षटकांत 9 बाद 344 (मार्क चॅपमन 132, डॅरिल मिचेल 76, मोहम्मद अब्बास 52, इरफान खान 3 बळी, अकिब जावेद व हॅरिस रौफ प्रत्येकी दोन बळी)
पाकिस्तान 44.1 षटकांत सर्वबाद 21 (अब्दुल शफीक 36, उस्मान खान 39, बाबर आझम 78, सलमान आगा 58, नॅथन स्मिथ 4 बळी, जेकब डफी 2 बळी).