For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा धुव्वा

06:54 AM Oct 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा धुव्वा
Advertisement

आयसीसी महिला विश्वचषक :  बेथ मुनीची संयमी शतकी खेळी : पाकिस्तानचा सलग तिसरा पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन महिलांनी आपला विजयीरथ कायम ठेवताना बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 107 धावांनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियन संघाचा हा दुसरा विजय असून गुणतालिकेत ते 5 गुणासह अव्वलस्थानावर आहेत. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन महिलांनी 9 बाद 221 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना पाकचा संघ 114 धावांत ऑलआऊट झाला. संयमी शतकी खेळी साकारणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला सातव्या षटकात पहिला धक्का बसला. कर्णधार एलिस हिली 20 धावा काढून बाद झाली. सलामीवीर लिचफिल्डलाही फातिमा सनाने बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. यानंतर स्टार फलंदाज एलिस पेरीही फारसा चमत्कार दाखवू शकली नाही. 5 धावा काढून ती माघारी परतली. पाठोपाठ अनाबेल सदरलँड (1), अॅश्ले गार्डनर (1), तहिला मॅकग्रा (5), ग्रिगोरिया (0) यांनीही निराशा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाची 7 बाद 76 अशी बिकट स्थिती झाली होती.

बेथ मुनीची शतकी खेळी

ऑस्ट्रेलिया महिला संघ अडचणीत सापडला असताना बेथ मुनीने ऑस्ट्रेलियासाठी महत्वाची भूमिका बजावत शतक झळकावले. तिने एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतक ठोकून आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास मदत केली. मुनीने 114 चेंडूचा सामना करत 109 धावा केल्या, ज्यात तिने 11 चौकार मारले. तिच्या या खेळीने तिने संघाला संकटातून बाहेर काढले.  मुनीने आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर ती बाद झाली असली तरी याने पुन्हा एकदा तिची खिलाडूवृत्ती आणि क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. मुनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजील येऊन ऑस्ट्रेलियाला 7 बाद 76 धावांच्या अनिश्चिततेतून बाहेर काढून 9 बाद 221 धावांपर्यंत पोहोचवले. दहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या अलाना किंगसोबत नवव्या विकेटसाठी तिने केलेली 106 धावांची भागीदारी खूप महत्त्वाची ठरली. अलानाने 49 चेंडूत नाबाद 51 धावांचे योगदान दिले. त्यात 3 षटकार आणि 3 चौकार लगावले.

पाकिस्तानचे 114 धावांत पॅकअप

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 222 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 36.3 षटकांत 114 धावांत ऑलआऊट झाला. पाककडून सिदरा अमीनने सर्वाधिक 35 धावांचे योगदान दिले. अमीन वगळता इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने पाकला 107 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार फातिमा सनासह इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थने सर्वाधिक 3 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलियन महिला संघ 50 षटकांत 9 बाद 221 (एलिसा हिली 20, बेथ मुनी 109, अलाना किंग नाबाद 51, नशरा संधू 3 बळी, फातिमा सना आणि शामीम प्रत्येकी 2 बळी).

पाकिस्तान 36.3 षटकांत सर्वबाद 114 (सिदरा आमीन 35, फातिमा सना 11, रामीन शमीम 15, किम गर्थ 3 बळी, मेगन स्कट आणि अनाबेल सदरलँड प्रत्येकी 2 बळी).

Advertisement
Tags :

.