‘डब्ल्यूसीएल’मधील सहभागावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाची बंदी
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) रविवारी ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स’च्या (डब्ल्यूसीएल) भविष्यातील आवृत्त्यांमध्ये त्यांच्या खेळाडूंच्या सहभागावर संपूर्ण बंदी जाहीर केली असून त्यांनी स्पर्धा आयोजकांवर पक्षपातीपणाचा आणि क्रीडा क्षेत्राप्रती प्रामाणिकपणाचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शेजारील देशाशी द्विपक्षीय क्रीडा संबंधा न राखण्याच्या देशाच्या भूमिकेचा हवाला देत भारतीय संघाने पाकिस्तानविऊद्धचा गट टप्प्यातील सामना आणि उपांत्य फेरीतील सामना न खेळणे पसंत केले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वर्ल्ड कप चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्समध्ये भविष्यातील सहभागावर संपूर्ण बंदी घालत आहे, असे पीसीबीने मोहसिन नक्वी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या बैठकीनंतर एका निवेदनात म्हटले आहे. सामना सोडून दिलेला असूनही भारताला गुण देण्याच्या डब्ल्यूसीएलच्या निर्णयास पीसीबीने तीव्र आक्षेप घेतला आहे आणि तो ढोंगीपणा आणि पक्षपातीपणा असल्याचे म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान गट टप्प्यात एकमेकांशी खेळणार होते. परंतु शिखर धवन, युवराज सिंग, इरफान पठाण, सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने दहशतवादी हल्ल्यानंतरच्या राष्ट्रीय भावना आणि भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा हवाला देत खेळण्यास नकार दिला.
भारताने उपांत्य फेरीतूनही माघार घेतल्याने, पाकिस्तान थेट अंतिम फेरीत पोहोचला. डब्ल्यूसीएलने जाणूनबुजून सामना सोडून देणाऱ्या संघाला गुण देण्याच्या भयानक वर्तनाची आणि नियोजित भारत विऊद्ध पाकिस्तान सामने रद्द झाल्याची घोषणा करणाऱ्या त्यांच्या निवेदनातील मजकुराची पीसीबीने मोठ्या निराशेने समीक्षा केली. यात ढोंगीपणा आणि पक्षपातीपणा भरला होता, अशी टीका त्यांनी केली आहे.
बोर्डाने पुढे म्हटले आहे की, ते त्यांच्या खेळाडूंना अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची परवानगी देऊ शकत नाही, जिथे खेळाची भावना राजकारणाने झाकोळली जाते. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांच्या सहमालकीच्या ‘डब्ल्यूसीएल’ने गट स्तरावरील सामना रद्द झाल्यानंतर अनेकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली होती. तथापि, ‘पीसीबी’ने या माफीला हास्यास्पद म्हटले आहे आणि आयोजकांवर एका विशिष्ट राष्ट्रवादी कथेकडे झुकल्याचा आरोप केला आहे.