सुरक्षापरिषदेत पाकिस्तान-चीनची फजिती
बलूच आर्मीविरोधी प्रस्तावावर अमेरिकेचा नकाराधिकार :
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि त्याचे आत्मघाती युनिट मजीद ब्रिगेडवर बंदीच्या प्रस्तावाला रोखले आहे. हा प्रस्ताव पाकिस्तान आणि चीनने मिळून सुरक्षा परिषदेच्या बैठकीत मांडल होता. या दोन्ही देशांनी बीएलएला प्रतिबंधित संघटना घोषित करण्याची मागणी केली होती. अमेरिकेने या प्रस्तावावर नकाराधिकार वापरल्याने या दोन्ही देशांची मोठी फजिती झाली आहे.
बीएलए, मजीद ब्रिगेड, अल-कायदा आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान यासारख्या दहशतवादी संघटना अफगाणिस्तानच्या भूमीवरून सक्रीय असून सीमापार हल्ले करत असल्याचा दावा पाकिस्तानने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत केला होता. अफगाणिस्तानातून फैलावणारा दहशतवाद पाकिस्तानचे सर्वात मोठे सुरक्षा आव्हान असल्याचेही म्हटले गेले होते.
अमेरिकेसोबत ब्रिटन आणि फ्रान्सने देखील या प्रस्तावाला विरोध केला आहे. यापूर्वी अमेरिकेनेच मागील महिन्यात बीएलए आणि मजीद ब्रिगेडला विदेशी दहशतवादी संघटना घोषित केले होते.
पुरेसे पुरावे नाहीत : अमेरिका
बीएलएलला अल-कायदाशी जोडण्यासाठी पुरेसे पुरावे नीत. यामुळे याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या 1267 निर्बंध यादीत सामील केले जाऊ शकत नाही असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. या यादीत सामील झालेल्या कुठल्याही संघटनेवर प्रवास निर्बंध, संपत्ती गोठविणे आणि शस्त्रास्त्र खरेदीवर बंदी घातली जाते.
बीएलएने 2024 साली कराची विमानतळानजीक आणि ग्वादार पोर्ट अथॉरिटी कॉम्प्लेक्समधील आत्मघाती हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती असे अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी मागील महिन्यात सांगितले होते. मार्च 2025 मध्ये जाफर एक्स्प्रेस रेल्वेच्या अपहरणाची जबाबदारी देखील बीएलएने स्वीकारली होती. या घटनेत 31 नागरिक आणि पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. तर 300 हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले होते.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी
भारताच्या फाळणी अन् पाकिस्तानच्या निर्मितीनंतर स्वतंत्र देश म्हणून बलुचिस्तानची निर्मिती होणे आवश्यक होते असे बलूच समुदायाचे मानणे आहे. बलूच समुदायाच्या इच्छेच्या विरोधात त्यांना पाकिस्तानात सामील करण्यात आले होते. या कारणामुळे बलूच समुदाय आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात संघर्ष होत आहे. बलुचिस्तानात स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या अनेक संघटना आहेत, परंतु सर्वात शक्तिशाली संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच आहे. ही संघटना 70 च्या दशकात अस्तित्वात आली, परंतु 21 व्या शतकात याचा प्रभाव वाढला आहे. बलुचिस्तानला पाकिस्तानी सरकार आणि चीनपासून मुक्ती मिळवून देण्याचे उद्दिष्ट बीएलएने बाळगले आहे.