For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकची दक्षिण आफ्रिकेवर 93 धावांनी मात

06:55 AM Oct 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकची दक्षिण आफ्रिकेवर 93 धावांनी मात
Advertisement

नौमनचे सामन्यात 10 बळी, आफ्रिदीचे 4 बळी, ब्रेविसचे अर्धशतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर, पाकिस्तान

पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या कसोटीत 93 धावांनी पराभव करून द.आफ्रिकेच्या दहा सामन्यांची विजयी मालिका खंडित केली. सामन्यात दहा बळी मिळविणाऱ्या नौमन अलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

द.आफ्रिकेला निर्णायक विजयासाठी पाककडून 277 धावांचे आव्हान मिळाले होते. तिसऱ्या दिवशी द.आफ्रिकेने दुसऱ्या डावात 2 बाद 51 धावा जमविल्या होत्या, या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळास त्यांनी प्रारंभ केला आणि नौमन अली व शाहीन शाह आफ्रिदी यांच्या भेदक माऱ्यापुढे उपाहारानंतरच्या सत्रात त्यांचा डाव 183 धावांत आटोपला. नौमन अलीने या सामन्यात 191 धावांत 10 बळी मिळविले. मायदेशात झालेल्या गेल्या पाच कसोटीत नौमनने 46 बळी मिळविले असून त्यात इंग्लंडविरुद्ध 20 व विंडीजविरुद्ध 16 बळींचा समावेश आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने 112 धावांत 6 बळी मिळविले होते तर दुसऱ्या डावात सलग 28 षटके गोलंदाजी करीत 79 धावांत 4 बळी मिळवित पाकच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आफ्रिदीने रिव्हर्स स्विंगच्या बळावर आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळून नौमनला चांगली साथ दिली. त्याने 33 धावांत 4 बळी टिपले.

फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर स्पिनर्सना सामोरे जाताना द.आफ्रिकन फलंदाजांना संघर्ष करावा लागला. पाकने पहिल्या डावात 378 धावा जमविल्यानंतर द.आफ्रिकेचा डाव 269 धावांत संपुष्टात आला. पण नंतर पाकचा दुसरा डावही केवळ 167 धावांत गुंडाळला गेला. पाकला पहिल्या डावात 109 धावांची आघाडी मिळविली होती, तीच त्यांना फायदेशीर ठरली.

सकाळच्या तिसऱ्याच चेंडूवर आफ्रिदीने पहिल्या डावातील शतकवीर टोनी डी झोर्झीला 16 धावांवर पायचीत केले. ट्रिस्टन स्टब्जचा स्पिनविरुद्धचा संघर्ष यावेळीही सुरूच राहिला आणि नौमनला रिव्हर्स स्वीप करताना स्लिपमध्ये झेलबाद झाला. देवाल्ड ब्रेविस व रेयान रिकेल्टन यांनी डाव सावरत 73 धावांची भागीदारी करून द.आफ्रिकेच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण दोघेही उपाहाराआधीच बाद झाल्याने पाकची विजयाची बळावली. 22 वर्षीय ब्रेविसने केवळ तिसऱ्या कसोटीत खेळताना पहिल्याच चेंडूवर पायचीत होता होता बचावला. त्याने नंतर जोरदार फटकेबाजी करीत चेंडूस धाव या गतीने 54 धावा जमविल्या. त्याने नौमनच्या एका षटकात एक षटकार व दोन चौकार लगावले आणि नंतर चौकार ठोकतच 51 चेंडूत अर्धशतकही पूर्ण केले. नौमननेच त्याची खेळी संपुष्टात आणली. ऑफस्पिनर साजिद खानने सावध खेळणाऱ्या रिकेल्टनचा प्रतिकार मोडून काढला आणि सलमान आगाने स्लिपमध्ये त्याचा झेल टिपला. त्याने 145 चेंडूत 45 धावा केल्या. यावेळी द.आफ्रिकेच्या 6 बाद 137 धावा झाल्या होत्या. ब्रेकनंतर साजिदने मुथुसामीला पायचीत केल्यावर आफ्रिदीने तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळून सामना संपवला.

या मालिकेतील दुसरी कसोटी रावळपिंडीत सोमवारपासून सुरू होईल. अनुभवी स्पिनर केशव महाराज संघात सामील होणार असल्याने द.आफ्रिकेची स्पिनची बाजू अधिक बळकट होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : पाक प.डाव 378, दुसरा डाव 167, द.आफ्रिका प.डाव 269 व दुसरा डाव सर्व बाद 183 : ब्रेविस 54, रिकेल्टन 45, काईल व्हेरेन 19, नौमन अली 4-79, शाहीन आफ्रिदी 4-33, साजिद खान 2-38.

Advertisement
Tags :

.