पाकची लंकेवर 31 धावांनी मात
सामनावीर फातिमा साना : 30 धावा व 10 धावांत 2 बळी
वृत्तसंस्था/ शारजाह
महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान महिला संघाने श्रीलंकेचा 31 धावांनी पराभव केला. अष्टपैलू कामगिरी करणारी पाकची कर्णधार फातिमा सानाला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. तिने 30 धावा व 10 धावांत 2 बळी मिळविले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या पाकने 20 षटकांत सर्व बाद 116 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेला 20 षटकांत 9 बाद 85 धावांवर रोखत पाकने सहज सामना जिंकला. पाकच्या डावात फातिमा सानाने सर्वाधिक 20 चेंडूत 30 तर निदा दारने 23, ओमायमा सोहेलने 18, सिद्रा अमिनने 12 व मुनीबा अलीने 11 धावा जमविल्या. लंकेच्या उदेशिका प्रबोधनी, सुगंदिका कुमारी, चमारी अटापटू यांनी प्रत्येकी 3 बळी मिळविले. लंकेच्या डावात निलाक्षिका सिल्वाने सर्वाधिक 22, विश्मी गुणरत्नेने 20 धावा केल्या. इतरांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पाकच्या सादिया इक्बालने 17 धावांत 3, फातिमा सानाने 2, ओमायमा सोहेल, नशरा संधू यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : पाक महिला 20 षटकांत सर्व बाद 116 : फातिमा साना 30, निदा दार 23, उदेशिका 3-20, सुगंदिका कुमारी 3-19, चमारी अटापटू 3-18, कविशा दिलहारी 1-16. लंका महिला संघ 20 षटकांत 9 बाद 85 : निलाक्षिका सिल्वा 22, विश्मी गुणरत्ने 20, साना 2-10, सादिया इक्बाल 3-17, सोहेल 2-17, नशरा संधू 2-15.