For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकचा इंग्लंडवर 152 धावांनी विजय

06:46 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकचा इंग्लंडवर 152 धावांनी विजय
Advertisement

नौमन अली, साजीद खान यांचे सामन्यात 20 बळी

Advertisement

► वृत्तसंस्था / मुल्तान

नौमन अली आणि साजीद खान यांच्या फिरकीच्या जोरावर यजमान पाकिस्तानने शुक्रवारी येथे दुसऱ्या कसोटीत खेळाच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा 152 धावांनी दणदणीत पराभव केला. तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत आता दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकून बरोबरी साधल्याने रावळपिंडीचा तिसरा सामना निर्णायक ठरेल. या सामन्यात 9 बळी मिळविणाऱ्या साजीद खानला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यात पाकने पहिल्या डावात 366 धावा जमविल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 291 धावांवर आटोपला. पाकने इंग्लंडवर पहिल्या डावात 75 धावांची आघाडी मिळविली. इंग्लंडच्या पहिल्या डावामध्ये साजीद खानने 111 धावांत 7 तर नौमन अलीने 101 धावांत 3 गडी बाद केले. पाकने दुसऱ्या डावात 221 धावा जमवित इंग्लंडला विजयासाठी 297 धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडने 2 बाद 36 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा डाव 33.3 षटकात 144 धावांत आटोपला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात नौमन अलीने 46 धावांत 8 तर साजीद खानने 93 धावांत 2 गडी बाद केले. या सामन्यामध्ये पाकच्या साजीद खान आणि नौमन अली या फिरकी जोडीने इंग्लंडचे 20 फलंदाज बाद केले.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावामध्ये कर्णधार स्टोक्सने 36 चेंडूत 4 चौकारांसह 37, पॉपने 2 चौकारांसह 22, रुटने 1 चौकारांसह 18, ब्रुकने 1 चौकारासह 16, कार्सेने 3 षटकारांसह 27 धावा जमविल्या. चौथ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ झाल्यानंतर साजीद खानने दुसऱ्याच चेंडूवर पॉपला टिपले. त्यानंतर नौमन अलीने आपल्या फिरकीवर इंग्लंडचे 7 गडी बाद केले. इंग्लंडचे फलंदाज स्वीपचे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. या मालिकेत इंग्लंडने पहिली कसोटी 1 डाव 47 धावांनी जिंकली होती. या पहिल्या सामन्यात इंग्लंडने आपला डाव 7 बाद 823 या विक्रमी धावसंख्येवर घोषित केला होता. पाकने ही दुसरी कसोटी जिंकून मालिकेत रंगत आणली आहे. तिसरी कसोटी येत्या गुरुवारपासून रावळपिंडीत खेळविली जाईल.

संक्षिप्त धावफलक: पाक प. डाव 366, इंग्लंड प. डाव 291, पाक. दु. डाव सर्वबाद 221, इंग्लंड दु. डाव 33.3 षटकात सर्वबाद 144 (स्टोक्स 37, पॉप 22, रुट 18, ब्रुक 16, कार्से 27, साजीद खान 2-93, नौमन अली 8-46)

Advertisement
Tags :

.