पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला
तेहरीक ए तालीबानच्या नेत्याला मारल्याचा दावा
वृत्तसंस्था/काबूल
एकीकडे भारत आणि अफगाणिस्तान एकमेकांच्या जवळ येत असताना, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये स्थित असणारी आणि पाकिस्तानात धुमाकूळ घालणारी ‘तेहरिके ए तालिबान पाकिस्तान’ या संघटनेच्या काबूल येथील मुख्यालयावर पाकिस्तानच्या युद्ध विमानांनी बाँब हल्ला केला आहे. बुधवारी ही घटना घडली. या संघटनेचे प्रमुख नेते नूर वली मेहसूद ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र, अफगाणिस्तानने तो खोटा ठरविला आहे. हा हल्ला शुक्रवारी सकाळी करण्यात आला. त्यावेळी काबूल येथील मुख्यालयात मेहसूद हे उपस्थित होते. त्यांचा पुत्र आणि इतर कुटुंबियही उपस्थित होते. तथापि, मेहमूद हे या हल्ल्यातून वाचले आहेत. मात्र, त्यांचा पुत्र ठार झाला आहे, अशी माहिती नंतर तालिबान प्रशासनाने दिली आहे. मेहसूद यांनी नंतर व्हिडीओ संदेश प्रसारित करुन आपण सुरक्षित आणि कार्यरत आहोत, असे स्पष्ट केले आहे.
सूडभावनेतून हल्ला
हा हल्ला पाकिस्तानने सूडभावनेतून केल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या प्रांतांमध्ये तेथील स्वातंत्र्येच्छूंनी केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले आहेत. या हल्ल्ल्याची जबाबदारी तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेने स्वीकारली आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी अफगाणिस्तानला धमकी दिली होती. अफगाणिस्तात आपल्या भूमीत दहशतवाद्यांना थारा देत आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर 48 तासांच्या आत पाकिस्तानने हा हल्ला केला आहे. 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची राजवट आपल्या हाती घेतली होती. त्यानंतर प्रथमच पाकिस्तानने असा वायुहल्ला या देशावर केला आहे. परिणामी, नजीकच्या भविष्यकाळात दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहचून नवा संघर्ष छेडला जाण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अमीर खान मुत्तकी सध्या भारताच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. हीच वेळ साधून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या राजधानीवर वायुहल्ला केला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या नियंत्रणात रहावे, अशी पाकिस्तानची इच्छा असल्याने अफगाण मंत्र्यांच्या भारत दौऱ्याची वेळ साधून हा हल्ला करण्यात आला. अफगाणिस्तानला घाबरविण्याचा पाकिस्तानच हेतू स्पष्ट होत आहे. त्यामुळे कदाचित अफगाणिस्तानही पाकिस्तानवर प्रतिहल्ला करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संघर्ष बळावणार आहे.
माहिती कोणी दिली ?
मेहसूद हे काबूलमधील मुख्यालयात आहेत, ही माहिती पाकिस्तानला कोणी दिली, हा प्रश्नही विचारण्यात येत आहे. तेहरीक ए तालिबानमध्येही पाकिस्तान समर्थक असणारे काही गट आहेत. त्यांनी ही माहिती फोडली असावी असे अनुमान आहे. यामुळे तेहरीक एक तालिबान या संघटनेतील अंतर्गत मतभेद उफाळून येण्याची शक्यता आहे. या दुफळीमुळे पोकळी निर्माण झाली असून हिंसाचार कुनार, नांगरहार आणि पक्तीता या सीमवर्ती भागांमध्ये परसणार आहे.
भारताचे सूक्ष्म लक्ष
या सर्व परिस्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर तापलेल्या वातावरणाचा परिणाम भारतावर थेटपणे होणार नसला, तरी भारताला सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे तज्ञांचे मत आहे. भारतानेही स्वत:च्या संरक्षणाची योग्य ती व्यवस्था केल्याचे स्पष्ट केले गेले आहे.