पाकिस्तान सैन्याने भीषण हल्ल्यांसाठी तयार रहावे
वृत्तसंस्था / काबूल
पाकिस्तानी वायुदलाने अफगाणिस्तानच्या पाकटीका प्रांतात 4 ठिकाणी हवाई हल्ले केल्यावर दोन्ही देशांमधील तणाव वाढत चालला आहे. तहरीक-ए-तालिबानच्या तळांना लक्ष्य केल्याचा दावा पाकिस्तानने केला. तर तालिबानने पाकिस्तानच्या हल्ल्यात सुमारे 50 जण मारले गेल्याचे म्हणत मृतांमध्ये महिला अन् मुलांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. टीटीपी कमांडरने एक व्हिडिओ जारी करत पाकिस्तानी सैन्याची तुलना इस्रायलसोबत केली आणि त्याच्याविरोधात जोरदार हल्ले सुरू करण्याची घोषणा केली आहे.
पाकिस्तानी सैन्याने भीषण हल्ल्यांसाठी तयार रहावे. पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात आमची कारवाई जिहादचा हिस्सा असल्याचे टीटीपीने म्हटले आहे. याचदरम्यान तालिबानने पाकिस्तानच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रs अन् एअर डिफेन्स तोफा रवाना केल्या आहेत. पाकिस्तानी सैन्याला या हल्ल्याकरता चोख प्रत्युत्तर दिले जाणार असल्याची घोषणा तालिबानचा संरक्षणमंत्री मुल्ला याकूबने केली आहे. तालिबानच्या विदेश मंत्रालयाने पाकिस्तानच्या दूतावास प्रभारीला पाचारण करत विरोध नोंदविला आहे.