पाकिस्तान-अफगाणिस्तान तात्काळ युद्धबंदीवर सहमत
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा : दोहा येथे दोन्ही देशांची बैठक
वृत्तसंस्था/ दोहा
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश 9 ऑक्टोबरपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी तात्काळ युद्धबंदीवर सहमत झाले आहेत. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात ही घोषणा केली. दोहा येथे कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंनी तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली. तथापि, ही युद्धबंदी किती यशस्वी होईल हे सांगणे कठीण आहे, कारण पाकिस्तानने यापूर्वी शुक्रवारी संध्याकाळी उशिरा युद्धबंदी असूनही अफगाणिस्तानच्या हद्दीत हवाई हल्ला केला होता. अफगाण तालिबानने या हल्ल्याचा निषेध करताना त्याला युद्धबंदीचे उल्लंघन म्हटले होते.
पाकिस्तान आणि अफगाण तालिबान यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान तणाव कमी करण्यावर एकमत होत असल्याचे दिसून येत आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोहा येथे झालेल्या बैठकीनंतर आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर एक निवेदन शेअर केले आहे. या निवेदनामध्ये कतार राज्य आणि तुर्की प्रजासत्ताक यांच्या मध्यस्थीने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात दोहा येथे चर्चेचा एक टप्पा पूर्ण झाला. चर्चेदरम्यान, दोन्ही बाजूंनी तात्काळ युद्धबंदी आणि दोन्ही देशांमधील कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता मजबूत करण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्यावर सहमती दर्शविल्याचे म्हटले आहे.
दोन्ही देश पुढील बैठकीस तयार
दोन्ही बाजूंनी येत्या काही दिवसांत युद्धबंदीची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी आणि विश्वासार्ह आणि शाश्वत पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढील बैठका घेण्यास सहमती दर्शविल्याचेही सांगण्यात आले. आता आगामी चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळत गेल्यास दोन्ही देशांमध्ये सुरक्षा आणि स्थिरता प्राप्त होण्यास हातभार लागणार आहे.
साडेचार तास बंद दाराआड बैठक
दोहा येथे पाकिस्तान आणि तालिबानच्या संरक्षणमंत्र्यांमधील बैठक ही दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमधील नवीनतम संघर्षानंतरची पहिली समोरासमोर बैठक होती. शनिवारी रात्री उशिरा बंद दाराआड झालेली बैठक सुमारे साडेचार तासांहून अधिक काळ चालली होती. या बैठकीत दोन्ही शेजारी देशांनी वाढत्या सीमा तणाव कमी करण्याच्या उद्देशाने उपाययोजनांवर चर्चा केली. कतारने या कराराला एक मोठे राजनैतिक यश म्हटले आहे.