शहरात गणेशमूर्तींच्या रंगकामाला प्रारंभ
उत्सव दोन महिन्यांवर आल्याने रंगशाळेत लगबग : बेळगावच्या गणेशमूर्तींना अनेक ठिकाणी विशेष मागणी
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने मूर्तिकारांकडून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. शहरातील मूर्तीशाळा आता रात्रंदिवस गजबजू लागल्या असून घरगुती गणेशमूर्तींना रंगकाम करण्याचे काम सुरू आहे. त्याच बरोबरीने मंडळांकडून सार्वजनिक गणेशमूर्तींची ऑर्डर देण्यात आल्याने मूर्तिकार गणेशमूर्ती घडविण्यामध्ये दंग असल्याचे चित्र दिसत आहे. बेळगाव शहर हे मूर्तिकारांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे तयार झालेल्या घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती बेळगावसह गोवा, कोकण, कोल्हापूर येथे नेण्यात येतात. विशेषत: गोवा येथून बेळगावच्या मूर्तींना विशेष मागणी असते. त्यामुळे दीड ते दोन महिने अगोदर या गणेशमूर्ती विक्रीसाठी घेऊन जातात.
गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल
दोन महिने आधीच गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. काही ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून ऑर्डरसाठी भक्तांची गर्दी होत आहे. सध्या पेण, मुंबई, कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणात मूर्ती बेळगावमध्ये विक्रीसाठी आल्या आहेत. पीओपी तसेच शाडूच्या मूर्ती विक्री केल्या जात आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्क्यांनी किमतींमध्ये वाढ झाली आहे.
बेळगावातील मूर्तिकारांना ऑर्डर
मूर्तिकार जे. जे. पाटील यांनी गणेशमूर्तींबाबत बेळगाव शहरासह आसपासच्या परिसरामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच इचलकरंजी, मिरज, कोल्हापूर, गोवा येथून सार्वजनिक गणेशमूर्तींची ऑर्डर बेळगावमधील मूर्तिकारांना मिळते. भव्यदिव्य आणि नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती सध्या घडविल्या जात आहेत. तीन-चार महिन्यांपासून मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून मूर्तींची निश्चिती करण्यात आली आहे.
-विनायक पाटील, मूर्तिकार