For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप-काँग्रेसमध्ये दक्षिणेत ‘पहले आप’!

02:57 PM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजप काँग्रेसमध्ये दक्षिणेत ‘पहले आप’
Advertisement

काँग्रेसमध्येही महिला की पुरुष? : मात्र दोन्ही पक्षांना विजयाची ’गॅरंटी’

Advertisement

पणजी : दक्षिण गोव्यातील उमेदवारीवरून भाजप व काँग्रेसमध्ये ‘तू तू मै मै’ नसले तरी सध्या ‘पहले आप, पहले आप’ करत वेळकाढू धोरण मात्र निश्चितपणे राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु या विलंबामुळे दोघांचेही घोडे अडले असून संभाव्य इच्छुकांचे चैतन्य हरवून त्यांच्यामध्ये नैराश्य येऊ लागले आहे. भाजपला दोन्ही मतदारसंघांत विजयाची हमखास गॅरंटी आहे. त्यातूनच त्यांच्याकडून, ‘आमच्यासाठी उमेदवारापेक्षा कमळ’ महत्त्वाचे असून लोक कमळाला  मतदान करतील, अशी वक्तव्ये येऊ लागली आहेत. दुसऱ्या बाजूने काँग्रेसनेही ‘वाट पाहू’ धोरण अवलंबले असून निवडणूक घोषणा होऊन तीन दिवस उलटले तरी उमेदवार घोषणेची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत. दरम्यान, मंगळवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी आज किंवा उद्या आपला उमेदवार जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र त्यांच्यात उमेदवार निवडीपेक्षा ‘पुरूष की महिला?’ हा गुंता सोडविण्यातच जास्त वेळ खर्ची घातला जात आहे. असे असले तरी भाजपकडून ही खेळी काँग्रेसला चकमा देण्यासाठी खेळली जात असल्याचीही चर्चा आहे.

दक्षिण गोव्यात पुरूष की महिला?

Advertisement

याप्रश्नी तानावडे यांना विचारले असता, ‘पुरूष की महिला’ हा मुद्दा नगण्य असल्याचे ते म्हणाले. दोन्ही जागा आम्हीच जिंकणार असून लोक ‘कमळा’ला म्हणजेच पर्यायाने भाजपला मतदान करतील अशी ठाम खात्री त्यांनी व्यक्त केली. भाजपने राष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र गोव्यातील दक्षिण मतदारसंघाचा गुंता अद्याप सुटलेला नाही. त्यात आधी संभाव्य पुरूष उमेदवारांची नावे समोर येत होती परंतु अचानक यु-टर्न घेत या मतदारसंघात महिला उमेदवार देण्याचे पक्षाने ठरविले व त्यासाठी काही महिलांची नावेही चर्चेत आली.

काँग्रेसमध्ये उमेदवार तयार, केवळ घोषणा बाकी

अशाप्रकारे खेळी करून काँग्रेसमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण करण्यात भाजपा यशस्वी ठरली असल्याचे दिसत आहे. काँग्रेसने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. उत्तरेत त्यांचे माजी मंत्री रमाकांत खलप, विजय भिके, सुनिल कवठणकर यांची नावे चर्चेत आहेत तर दक्षिणेत विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर आणि विरियाटो फर्नांडिस यांच्यात चुरस आहे. दरम्यान, अशाप्रकारे उमेदवार जाहीर करण्यात होणाऱ्या विलंबाचा परिणाम मतदारांवर होणार नाही का, असे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यास विचारले असता, त्यांनी कोणताही परिणाम होणार नसल्याचे ठामपणे सांगितले. कोणता निर्णय केव्हा घ्यायचा हे काँग्रेसला पूर्ण माहीत आहे. त्याचबरोबर मतदारांवरही आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.