For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शैक्षणिक संस्थांकडून फसगत होणार नाही याची दक्षता घ्या

06:49 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
शैक्षणिक संस्थांकडून फसगत होणार नाही याची दक्षता घ्या
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

आपल्या संस्थेत प्रवेश घेतल्यास भरमसाठ पगाराची कायमस्वऊपी नोकरी देण्याचे आश्वासन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये डोळे झाकून प्रवेश घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी आधी त्या संस्थेबद्दल सविस्तर माहिती मिळवावी. त्यानंतरच प्रवेश घ्यावा. तरच फसवणूक होण्यापासून वाचू शकाल, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

Advertisement

अशा संस्थांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करावे. सरकारी आयटीआयमध्ये अशा प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध असल्यास त्यांना प्राधान्य द्यावे. आयटीआयमध्ये कमी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळते. बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळीच योग्य करियर सल्ला न मिळाल्याने त्यांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांनी या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन करावे. तसेच सरकारच्या विविध योजनाही त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. योग्य करिअर केल्यास राज्यातच रोजगाराच्या अपार संधी उपलब्ध होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी राज्यातील स्वयंपूर्ण मित्रांना व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित केलें. त्यावेळी ‘स्वयंपूर्ण गोवा’ अंतर्गत कृषी आणि शिक्षण खात्यावर भर देण्यात येतो असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कृषी संचालक संदीप फळदेसाई, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पंचसदस्य आणि वरिष्ठ अधिकारी व्हर्चुअल माध्यमातून उपस्थित होते.

नोकऱ्यांच्या आश्वासनांना बळी पडू नका

खासगी अभ्यासक्रम शिकविणाऱ्या अनेक संस्था मोठ्या पगाराच्या कायमस्वऊपी नोकऱ्या देण्याची आश्वासने देतात. त्यांच्या आश्वासनांना भुलून अनेक विद्यार्थी प्रसंगी कर्ज काढून अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळवतात. मात्र अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर या संस्था त्यांच्या नोकरीची जबाबदारी झटकतात. त्यातून विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग होते. ही फसवणूक टाळण्यासाठी आता अशा खासगी संस्थांची चौकशी करण्यात येणार आहे. तसा आदेश शिक्षण खात्याला देण्यात आला आहे. अशा संस्था तसेच त्यांचे अभ्यासक्रम शिक्षण खात्याशी संलग्न आहेत किंवा नाही, त्यांना खात्याची मान्यता आहे की नाही याचीही खात्याकडून तपासणी होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

खासगी संस्थांच्या सत्यतेबद्दल शंका

महागडे अभ्यासक्रम करूनही रोजगार मिळाला नसल्याने अनेक युवक युवतींकडून सरकारकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अशा संस्थांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. परिणामी अशाप्रकारे विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या खासगी संस्थांच्या सत्यतेबद्दल शंका निर्माण झाली असून अशा कैक संस्था सरकारच्या स्कॅनरवर आल्या आहेत. कोणती संस्था किती शुल्क आकारून कोणते अभ्यासक्रम शिकविते याची सविस्तर माहिती सरकारला मिळाली असून या संस्थांची नावे शिक्षण खात्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

त्यांची आता चौकशी होणार असून बोगस संस्था आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याशिवाय मान्यता नसलेल्या खासगी संस्थांचीही चौकशी प्रारंभ होणार आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम आणि संस्था निवडताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. संबंधित संस्था मान्यताप्राप्त आहे का आणि त्या संस्थेला सबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यास गोव्यात परवानगी आहे काय याबद्दल माहिती घेऊनच प्रवेश घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.