‘पहलगाम’मधील हल्लेखोर महिन्याभरानंतरही मोकाट
गुन्हेगारांचा काहीच सुगावा नाही : सुरक्षा दलांसमोर आव्हान
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही हल्लेखोर चार दहशतवाद्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. 22 एप्रिल रोजी हल्ला झाल्यानंतर 24 तासांच्या आत तपास यंत्रणांनी हल्लेखोरांचे रेखाचित्र जारी केले होते. परंतु 30 दिवसांनंतरही गुन्हेगारांबद्दल कोणताही सुगावा लागलेला नाही. भारतीय लष्करासह अन्य सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने राबविण्यात आलेल्या कारवाईत काही संशयितांचा खात्मा करण्यात आला असला तरी त्यामध्ये पहलगाममध्ये दहशत माजवणाऱ्या हल्लेखोरांचा समावेश असल्याची स्पष्ट माहितीही उघड झालेली नाही.
22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक महिना उलटला आहे. परंतु राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अजूनही 26 नागरिकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 25 पर्यटक आणि एका विदेशी नागरिकाचा समावेश होता. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव आणखी वाढला आहे.
भारतीय तपास यंत्रणांना आतापर्यंत हल्लेखोर दहशतवाद्यांबद्दल कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. हल्ल्याच्या काही दिवसांनंतर तपास जम्मू काश्मीर पोलिसांकडून एनआयएकडे सोपवण्यात आला. एनआयए प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहे. तसेच तांत्रिक पद्धती वापरून डेटाचे विश्लेषणही करण्यात आले. हा हल्ला किमान पाच दहशतवाद्यांनी केला असून त्यापैकी तिघेजण पाकिस्तानचे असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांनी तीन दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केली असून त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला प्रत्येकी 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
सुमारे 150 स्थानिकांची चौकशी
सुरुवातीला जम्मू काश्मीर पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले. त्यानंतर एनआयएने नवीन गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आतापर्यंत, सुमारे 150 स्थानिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये पोनी मालक, दुकानदार, छायाचित्रकार आणि साहसी खेळांमध्ये सहभागी असलेले लोक यांचा समावेश आहे. एनआयएने एका स्थानिक व्यक्तीचीही चौकशी केली असून त्याने घटनेच्या 15 दिवस आधी परिसरात दुकान उघडले होते. परंतु हल्ल्याच्या दिवशी ते बंद ठेवले होते. मात्र, आतापर्यंत त्याच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. तपास यंत्रणेने हल्ल्याच्या ठिकाणाहून मोबाईल फोनवरून डेटा गोळा केला असून त्यामध्ये पीडितांच्या नातेवाईकांनी आणि पर्यटकांनी काढलेले फोटो आणि व्हिडिओ यांचा समावेश आहे. हे तांत्रिक मदतीने वापरले जात आहेत. याशिवाय, दहशतवादी कुठून आले, ते किती काळ राहिले आणि ते कोणत्या दिशेने पळून गेले हे समजून घेण्यासाठी बैसरन खोऱ्याचा थ्री-डी नकाशा देखील तयार करण्यात आला आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्याच्या तपासातही असाच नकाशा बनवण्यात आला होता.
शेकडो जण ताब्यात, पण...
हल्ल्याच्या काही दिवसांनंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू करत शेकडो लोकांना ताब्यात घेतले. यामध्ये ओव्हरग्राउंड वर्कर्सचा समावेश होता. या कारवाईमागे हल्ल्याशी संबंधित माहिती गोळा करणे आणि असे हल्ले सहन केले जाणार नाहीत हे दाखवणे असे दोन उद्देश होते. तथापि, आतापर्यंत तपासात कोणतीही महत्त्वपूर्ण प्रगती झालेली नाही. या प्रकरणात एका पर्यटकाने तीन लोकांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओतील लोकांना ताब्यात घेतले असले तरी त्यांच्याकडून ठोस माहिती न मिळाल्याने त्यांना सोडण्यात आले.