Pahalgam Attack: ड्रायव्हरचे ‘ते’ विधान अन् पाचव्या दिवशी हल्ला, पर्यटकांनी सांगितला थरारक किस्सा
कारचालकाने पहलगाम परिसरात एका निर्जन रस्त्यातच उतरवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली
By : शेखर सामंत
सिंधुदुर्ग : ‘आमचे काम पर्यटकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे एवढेच आहे. वाटेत जर त्यांना कोणी गोळ्या घालून ठार मारले, त्यांचे अपहरण केले वा लुटले तर आम्हाला त्याची अजिबात पर्वा नाही. आम्हाला फक्त पैशांशी मतलब’, असे सांगत सिंधुदुर्गातील पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबाला कारचालकाने पहलगाम परिसरात एका निर्जन रस्त्यातच उतरवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर जबरदस्तीने पैसे घेऊन बेजबाबदारपणे निघून जाणाऱ्या त्या ड्रायव्हरवर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रीती कदम या महिलेने केली आहे.
दरम्यान, 18 एप्रिलच्या या घटनेनंतर अवघ्या पाच दिवसात अतिरेक्यांनी त्याच पहलगाम परिसरात पर्यटकांचे हत्याकांड घडविले, त्याचा अप्रत्यक्ष संबध या घटनेशी आहे का, असाही संशय बळावला आहे. पर्यटकांना ठार मारले तरी आम्हाला त्याची पर्वा नाही, असे उद्गार पर्यटकांसमोर काढत त्याच पहलगाममध्ये पर्यटकांना रस्त्यातच उतरवत बेजबाबदारपणे निघून जाणाऱ्या या चालकाला पुढच्या काही दिवसात याच परिसरात पर्यटकांवर हल्ला होणार, याची कुणकुण होती, असे वाटत नाही का? देशाचे संरक्षण करणाऱ्या सी. आर. पी. एफ. जवानांविरुद्ध विष ओकणारी भाषा करणाऱ्या या विकृत चालकाचे अतिरेक्यांशी संबंध तर नाहीत ना, याची गांभीर्याने चौकशी होणे गरजेचे आहे.
कुडाळ येथे सिंगिंग क्लब चालविणाऱ्या प्रीती कदम या मुंबई येथील असल्या तरी त्या सध्या कुडाळ येथे स्थायिक झाल्या आहेत. पहलगाम येथे अतिरेक्यांनी जे पर्यटकांचे हत्याकांड घडवून आणले, त्याच्या पाच दिवस आधी त्या आपल्या दोन मुली आणि आईसमवेत पहलगाम येथे गेल्या होत्या. त्यांनी जम्मू-कटरा येथील एका स्थानिक एजंटमार्फत हा काश्मीर दर्शनाचा दौरा आखला होता. मात्र, श्रीनगर येथे एअरपोर्टवर उतरल्यापासूनच त्यांना वाईट अनुभव यायला लागले. त्यांना दिलेल्या ड्रायव्हर हा अतिशय अॅरोगंट आणि भारतद्वेषी असल्याचे त्याच्या बोलण्यावरून दिसून आले. तसेच त्या ट्रॅव्हल एजंटने दिलेले हॉटेलदेखील अतिशय बोगस असल्याचे आढळले.
ड्रायव्हरचे ‘ते’ विधान आणि पाचव्या दिवशी पर्यटकांवर हल्ला
दरम्यान, या अनपेक्षित घटनेने कदम कुटुंबियांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्या ज्या हॉटेलमध्ये उतरल्या होत्या, तेथील एका ड्रायव्हरला फोन करून ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली. मग त्या ड्रायव्हरने माणुसकी दाखवत कदम कुटुंबियांना हॉटेलवर सुखरुप आणण्यासाठी दुसरी टॅक्सी पाठवली व सर्वजण हॉटेलवर आले. नंतर कदम यांनी तात्काळ त्या हॉटेलवरचा आपला बाडबिस्तारा गुंडाळून परतीचा मार्ग धरला. या दरम्यान त्यांनी श्रीनगर येथील एका टुरिस्ट पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यांनी आपला मेल आयडी देत त्यावर ऑनलाईन तक्रार नोंदवायला सांगितली. परंतु, आधी काश्मीरमधून बाहेर पडू, असे म्हणून कदम कुटुंबियांनी काढता पाय घेतला. पुढच्या पाच दिवसात त्याच परिसरात भीषण हल्ला झाला.
वाटेतच उतरविले
खरेतर, या ड्रायव्हरला पूर्ण दौऱ्यासाठी बुक केले होते. त्यामुळे या पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी त्याची होती. परंतु पहलगामनजीक त्या दिवशी अचानक ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने कदम कुटुंबियांना टॅक्सीतून उतरून नजीकचे एक पर्यटनस्थळ पाहून येण्यास तासभर उशीर झाला. या विलंबाने तो चालक प्रचंड संतापला. त्याने कारमध्येच कदम यांच्यासोबत कडाक्याचे भांडण केले. पहलगामनजीकच्या एका निर्जन रस्त्यात त्याने जोरात ब्रेक दाबून गाडी थांबविली.
जबरदस्तीने कदम कुटुंबियांना रस्त्यात उतरविले. त्यांचे डिकीतील सामानही बाहेर काढले. ताबडतोब माझे पैसे द्या, असा दम दिला. तुम्हा पर्यटकांना ठार मारले तरी आम्हाला त्याची फिकीर नाही. आम्हाला आमच्या पैशांशी मतलब असे सांगून त्याने संपूर्ण कुटुंबाला दमात घेतले. जबरदस्तीने भाडे घेतले. अखेर जीवाच्या भीतीने प्रीती यांनी त्या ड्रायव्हरला पैसे दिले. पैसे मिळताच या कदम कुटुंबियांना त्या निर्जन रस्त्यावर सोडून देत तो ड्रायव्हर आपली कार घेऊन उद्दामपणे निघून गेला.