विणकर सेवा संघातर्फे विविध मागण्यांसाठी पदयात्रा
19 रोजी हुबळी येथे छेडणार आंदोलन
बेळगाव : राज्य तसेच केंद्र सरकारने बांधकाम कामगारांच्या धर्तीवर व्यावसायिक विणकरांना कामगार सुविधा देण्यासोबतच कामगार कार्डचे वितरण करावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय विणकर सेवा संघाच्यावतीने पदयात्रा काढली जात आहे. बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी येथून सुरू झालेली ही पदयात्रा बुधवारी बेळगावमध्ये दाखल झाली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आता 19 रोजी हुबळी येथे आंदोलन केले जाणार आहे. हातमाग विकास महामंडळात गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. केएचडीसीमध्ये 37 वर्षांपासून राहणाऱ्या चारशे कुटुंबांसाठी सीटीएस हक्काच्या उताऱ्याशिवाय अनेक जण वंचित आहेत. त्यांना लाभ मिळवून द्यावा. विणकरांना व्यवसायासाठी देण्यात आलेले कर्ज माफ करावे. केंद्र सरकारच्या कृषी सन्मान योजनेप्रमाणे विणकर सन्मान योजना राबवावी. आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यांच्या धर्तीवर प्रोत्साहनधन द्यावे, यासह इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. बनहट्टी येथून सुरू झालेली ही पदयात्रा महालिंगपूर, मुडलगी, गोकाक, यमकनमर्डी मार्गे बेळगावमध्ये दाखल झाली. आता ही पदयात्रा धारवाडमार्गे हुबळी येथे पोहोचणार असून शनिवार दि. 19 रोजी हुबळी येथील केएसडीसी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. संघाचे अध्यक्ष शिवलिंग तिरकी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.