पद्मश्री प्रा. रोहिणी गोडबोले यांचे निधन
प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ आणि लैंगिक समानतेच्या प्रणेत्या : वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि लैंगिक समानतेच्या प्रणेत्या पद्मश्री प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांची प्राणज्योत शुक्रवारी मावळली. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बहुमूल्य योगदानासाठी त्यांचा 2009 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरव केला गेला. इतकेच नव्हे तर त्यांना ‘नॅशनल अवॉर्ड ऑफ मेरिट’ या पुरस्कारने गौरविण्यातही आले होते. फ्रान्स सरकारचा एक पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला होता. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकभावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
शिक्षण क्षेत्रात प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले हे नाव फार मोठे आहे. विज्ञान आणि गणितामध्येही त्यांचे मोठे योगदान होते. मूळच्या पुण्याच्या असलेल्या प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले विज्ञान आणि गणित क्षेत्रातील त्यांच्या बहुमूल्य योगदानासाठी ओळखल्या जातात. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील हुजूरपागा या विद्यालयातून झाले. शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी आणि भौतिकशास्त्र, गणित आणि सांख्यिकी विषयात पदवीधर होण्यासाठी प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांनी पुण्यातील परशुरामभाऊ महाविद्यालयाची निवड केली. सावित्रीबाई पुणे विद्यापीठातून पदवी मिळवत त्यांनी आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेतला. तसेच त्यांनी न्यूयॉर्कच्या स्टोनी ब्रोक युनिव्हर्सिटीत पुढील शिक्षण घेतले होते.