वृक्षमाता पद्मश्री पुरस्कार विजेत्या तुळसीगौडा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी
कारवार : वृक्षमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या तुळसीगौडा यांच्या पार्थीवावर अंकोला तालुक्यातील होन्नळी येथे शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पर्यावरणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या तुळसीगौडा यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले होते. अंकोला तालुका प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची तयारी केली होती. गौडा यांचे पार्थीव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पोलीस खात्याकडून तीनवेळा हवेत गोळीबार करण्यात आला. कारवार अंकोलाचे आमदार सतीश सैल, कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांच्यासह अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. अंत्यसंस्कारावेळी गौडा यांचे कुटुंबीय, समाजबांधव आणि त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमारसह अनेक मान्यवरांनी गौडा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.