पद्मश्री पुरस्कारप्राप्त सुक्री गौडा यांचे निधन
कारवार : लोकगीत कोकिळा म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त सुक्री बोम्मा गौडा (वय 91) यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून सुक्री गौडा यांच्यावर मंगळूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तथापि, गुरुवारी पहाटे अंकोला तालुक्यातील बडगेरी येथील स्वगृही त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कारवार जिल्ह्यातील आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत मागासलेल्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हालुक्की वक्कलीग समाजात गौडा यांचा जन्म झाला होता. गौडा या समाजातील तत्कालीन परिस्थितीमुळे शाळेची पायरी कधी चढल्या नाहीत. तथापि, त्यांनी अनेक लोकगीते रचली.
इतकेच नव्हे तर त्या लोकगीतांना आपला स्वर दिला. त्यामुळे त्या संपूर्ण जिल्ह्यात लोकगीत कोकिळा म्हणून ओळखल्या जात होत्या. गौडा यांनी लोकगीत क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने 2017 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. गौडा यांच्या वाट्याला पद्मश्री व्यतिरिक्त अनेक पुरस्कार आले. 1999 साली त्यांना लोकगीत श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 2006 मध्ये त्यांना कर्नाटकातील प्रतिष्ठीत म्हणून ओळखला जाणारा ‘नाडोज’ पुरस्कार बहाल करण्यात आला. 2023 मधील विधानसभा निवडणुकीवेळी प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी अंकोला दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी सुक्री गौडा यांचा आशीर्वाद घेतला होता.
विश्वविद्यालयात धडे दिले
सुक्री गौडा यांच्या लोकगीत क्षेत्रातील अफाट ज्ञानामुळे आणि प्रभुत्वामुळे धारवाड येथील कर्नाटक विश्वविद्यालयातील लोकगीत विभागात ‘हालक्की वक्कलीग’ समाजाची वेशभूषा, लोकगीत, आहार आणि श्रीमंत संस्कृतीबद्दल पाच वर्षे अतिथी व्याख्याती या नात्याने सेवा बजावली. शाळेची पायरी न चढलेल्या महिलेने केलेला हा एक पराक्रमच म्हणावा लागेल.
दारुबंदीच्या विरोधात आंदोलन
अंकोला तालुक्यातील बडगेरी येथील आपल्या समाजातील पुरुषमंडळी दारूच्या आहारी जाऊन आपले संसार उद्ध्वस्त करीत आहेत, याची जाणीव होताच त्यांनी दारूविरोधात आंदोलन छेडले. याशिवाय त्यांनी अनेक समाजोपयोगी आंदोलने छेडली आणि यशस्वी करून दाखविली.
शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप
गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात गौडा यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सरकारच्यावतीने जिल्हाधिकारी के.लक्ष्मीप्रिया यांनी गौडा यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हा पालकमंत्री, मासेमारी व बंदर खात्याचे मंत्री मंकाळू वैद्य, कारवार अंकोलाचे आमदार सतीश सैल आदी उपस्थित होते.