तालुक्याच्या पश्चिम भागात भात पोसवणीला सुरुवात
वार्ताहर/किणये
यंदा तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र हिरवाईने नटलेला सुंदर परिसर पहावयास मिळत आहे. अति पावसामुळे काही शिवारातील भात पिकांचे नुकसानही झाले. मात्र उर्वरीत असलेल्या भात पिकाला बऱ्यापैकी बहर आली आहे. पश्चिम भागात भात पोसवणीला सुरुवात झाली असून, या भागातील भात शिवारात जणू हिरवा शालू पांघरला आहे. वर्षभर शेतशिवारात काबाडकष्ट केल्यानंतर शेतात जर चांगल्या पद्धतीचे पीक बहरुन आले तर यातच बळीराजाला खरा आनंद मिळतो. शेतात पिकणाऱ्या पिकाला शेतकरी धान्यरुपी सोनंच समजतो. तालुक्याच्या पश्चिम भागात असंच भात पिकाच्या स्वरुपात हिरवे सोनं दिसून येत आहे.
यंदा मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेत शिवारात पाणी साचले होते. यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली तर मार्कंडेय व मुंगेत्री नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या शिवारात भात रोपलागवड केलेली पिके खराब झाली. यामुळे पुन्हा शिवारात भात रोपलागवड शेतकऱ्यांना करावी लागली. नुकसानीतून शिल्लक राहिलेले भात पीक चांगल्या पद्धतीने काढण्यासाठी यंदा बरीच मेहनत घेतली होती. गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी भात पिकांवर किड व रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. यावर विविध प्रकारची औषध फवारणी केली होती. बासमती, इंद्रायणी, सोना मसुरी, सोनम, शुभांगी, जया, माधुरा, भाग्यश्री आदी भातपिके घेण्यात आलेली आहेत. सध्याच्या या वातावरणात शेत शिवारातील पिके मात्र हिरवाईने नटलेली दिसून येत आहेत.