सांबरा-बाळेकुंद्री खुर्द परिसरात भातकापणीच्या कामाची धांदल
वार्ताहर/सांबरा
सांबरा-बाळेकुंद्री खुर्द परिसरात भातकापणीच्या कामाची एकच धांदल उडाली असून शेतकरी वर्ग भातकापणीच्या कामात मग्न असल्याचे चित्र पहावयास मिळत असून शिवार शेतकऱ्यांनी व मजुरांनी फुलून गेले आहे. सांबरा-बाळेकुंद्री खुर्द परिसरातील सर्व भातपिके कापणीला आली आहेत. सर्वांनी भातकापणीच्या कामाला एकाचवेळी प्रारंभ केल्याने भात कापणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. सध्या पावसानेही चांगली उघडीप दिली आहे. त्यामुळे मुतगा, निलजी, बसवण कुडची परिसरातही भातकापणीला जोर येणार आहे. पाऊस गेला असला तरी शिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे भात कापताना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी परगावच्या मजुरांना घेऊन भात कापणीला प्रारंभ केला आहे. शिवारात पाणी असल्याने कडधान्य पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कडधान्य पेरणी लांबणीवर पडल्यास याचा परिणाम कडधान्याच्या उत्पादनावर होणार आहे.
कडधान्य पेरणी लांबणीवर पडण्याची चिन्हे
सध्या पावसाने उघडीप दिल्याने बाळेकुंद्री परिसरात भातकापणीच्या कामांना जोर आला आहे. भातकापणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी घरच्या सदस्यांना घेऊन दररोज थोडे थोडे का होईना भाताची कापणी करत आहेत. त्यानंतर लगेच कडधान्याची पेरणी केली जाते. मात्र शिवारात अजूनही मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने कडधान्य पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
- सचिन पाटील शेतकरी, बाळेकुंद्री खुर्द
मजुरांचा भाव वाढला
सध्या बाळेकुंद्री खुर्द परिसरात भातकापणीची कामे जोरात सुरू आहेत. येथील सर्व भातपिके एकाचवेळी कापणीला आली असल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मजुरांचा भाव वधारला आहे.
- गीता मुतगेकर, बाळेकुंद्री खुर्द