पावसामुळे भातकापणी खोळंबली
पूर्वभागातील सांबरा, बसवण कुडची, निलजी भागात ढगाळ वातावरण
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले असून गुऊवारी रात्री पावसाच्या सरीही कोसळल्या. त्यामुळे पूर्व भागातील भात कापणीच्या कामाना ब्रेक लागला आहे. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द आदी भागांमध्ये भातकापणी जोरात सुरू होती. पूर्व भागामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अशातच गुऊवारी रात्री पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कापलेली भातपिके पावसात सापडली आहेत. अजून निम्म्याहून जास्त शिवारातील भात कापणीची कामे शिल्लक आहेत. शिवारात पाणी व चिखल असल्याने भातकापणी करताना शेतकऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी शेतकऱ्यांची कापलेली भातपिके गोळा करण्यासाठी लगबग सुरू होती.
कंग्राळी बुद्रुक परिसरात पावसाने उडवली झोप
कंग्राळी बुद्रुक परिसरात गुरुवारी रात्री पडलेल्या परतीच्या पावसामुळे भात कापणी केलेल्या शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. परंतु ज्या शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भाताच्या गंज्या घातल्या आहेत, त्यांना दिलासा मिळाला. कापणीबरोबर मळणीसाठी भातपीक खळ्यामध्ये टाकलेले आहे त्यांना हा पाऊस त्रासाचा ठरणार आहे. एकंदर या पावसाने शेतकरी वर्गाची झोप उडविल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर्षी प्रारंभापासूनच पेरणी, भात रोप लागवड करणेपासून पोसावणी ते भात दाणेदार होण्यापर्यंत पावसाने चांगली साथ दिली. निसर्गाने हंगामशीर साजेसे हवामान दिल्यामुळे भातपपी तरारुन आलेली आहेत.