अवकाळी पावसामुळे भाताच्या सुगीला ब्रेक
पावसामुळे भातपिकाचे प्रचंड नुकसान : शिवारात पाणी साचल्याने भात कापणीत व्यत्यय
खानापूर : खानापूर तालुक्मयात सर्वाधिक भाताचे पीक घेण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून भात पिकाची सुगी सुरू आहे. शेतकरी भात कापून मळून घरी आणण्याच्या लगबगीत लागलेले आहेत. अशातच गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने प्रामुख्याने भातकापणी करून ठेवलेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणीच पाणी झाल्याने कापून ठेवलेले भात पाण्यात सापडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या आठवड्यात पावसाने थोडीफार उघडीप दिल्याने काहीसा मिळाला होता. शेतकऱ्यांनी भाताची कापणी आणि मळणीसाठी जोरदार कामाला लागले होते. मात्र अशातच गुरुवारी पावसाने झोडपल्याने कापणीला आलेले भातपिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. शेतकऱ्यांच्या भातमळण्या पावसात अडकल्या आहेत.
शिवारातील पाणी काढण्याची कसरत
अवकाळी पावसामुळे शिवारातून पुन्हा पाणी साचले आहे. याचा फटका सुगीच्या कामांना बसत आहे. परिणामी पावसाचे साचलेले पाणी काढण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. शिवारातील पाणी कमी झाल्याशिवाय सुगीच्या कामांना गती येणार नाही. ऊस तोडणीचा हंगामाला देखील याचा फटका बसला आहे. अद्याप तालुक्यात म्हणावे तितक्या गतीने ऊस तोडण्या सुरू नाहीत. खानापूर लैला शुगर्सनेही अद्याप साखर कारखाना सुरू करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. मागीलवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लावणी केलेला ऊस तोडणीला आलेल्या उसाला फुलोरा येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील कारखान्यानेही अद्याप आपल्या टोळ्या तालुक्यात पाठवलेल्या नसल्याने ऊसतोडणी लांबणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. त्यातच पावसानेही जोर केल्याने ऊसपिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर्षी पावसाळा लांबल्याने भाताची सुगीही वेळाने सुरू झाली आहे. नोव्हेंबरच्या 15 तारखेनंतर परतीच्या पावसाचा तडाखा बसल्याने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.