येळ्ळूर शिवारात भातकापणीची लगबग
निसर्गाने साथ देताच कामाला सुरुवात : मजुराविना शेतकऱ्यांची गैरसोय : घरच्या लोकांनाही लावले कामाला
वार्ताहर/येळळूर
पावसाने दिलेली उघडीप आणि कडक ऊन यामुळे शेतकऱ्यांनी हंगाम साधून,भात कापणीला सुरुवात केल्याचे चित्र येळ्ळूर शिवारात पहायला मिळत आहे. गेले पंधरा दिवस सुरू असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची झोप उडली होती. हाता-तोंडाशी आलेला घास मातीमोल होतो की काय असा प्रश्न अवेळी पडणाऱ्या पावसाकडे बघून शेतकऱ्याना पडला होता. पण, निसर्गाने साथ देताच त्याने भातकापणीला सुरुवात केली आहे.
कापणीला अजून म्हणावा तसा जोर चढला नसून, अजुन शिवारात पावसाचे पाणी आणि चिखल आहे. त्यातून पीक कसे बाहेर काढावे ही चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे. त्यामुळे शेतातील पाणी काढण्यासाठी कालवे काढून पाणी बाहेर काढण्याचेही काम सुरू आहे. भात कापणी आली असली तरी हंगाम न मिळाल्याने शेतकरी ज्या ज्या ठिकाणी हंगाम मिळत आहे. तेथील भात कापणी करून हळूहळू कामाचा बोजा हलका करण्याचा प्रयत्न करत आहे.
बोचऱ्या थंडीचाही त्रास
रात्रभर पडणारी बोचरी थंडी, पहाटेचे धुके आणि दिवसभर असणारे निरभ्र आकाश व कडाक्याचे ऊन बघता आता पाऊस येणार नाही असे वडीलधारी माणते सांगत आहेत. ज्यानी भात कापणी केली आहे ते भात वाळवूनच रचत असल्याचे चित्र आहे.
मजुरांचा तुटवडा : शेतकऱ्यांची गैरसोय
कमी-जास्त दिवसाच्या पिकामुळे भातकापणी मागेफुढे होत असते. पण, यावर्षी पावसामुळे भातकापणी लांबली असल्याने सर्वच भातकापणी एकाच वेळी आल्याने मजुरासाठी शेतकऱ्याना धावधाव करावी लागत आहे. काहीनी आठ दिवस आधीच मजुरांची बांधणी केली असून त्यानी आता हंगाम मिळेल तेथील भात कापणी सुरू केली आहे. त्यामुळे मजुरांचे या हंगामात जास्तच महत्त्व वाढले असून मजुरीतही थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे.
हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
कांही शेतकऱ्यांनी मजुराबरोबर घरच्या माणसाना देखील सुगीसाठी कामाला लावले असले तरी अशी जुळवाजुळव केल्याशिवाय सुगी आवरणार नाही. भाताची सराय गेली तर भात मोडण्याची दाट शक्यता असते. शिवाय आख्खा तांदूळ होत नसल्याने त्याचा परिणाम भात विकताना दरावर होतो. यासाठी सराय साधण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे.
एक दोन दिवसात कापणीला जोर
येत्या एक दोन दिवसात कापणीला जोर चढेल असे चित्र आहे. त्यातूनही कमी शेती असणारे शेतकरी भात कापणी झाल्यावर ते न रचता मळणी करूनच धान्य घरी आणत असल्याने कापणीबरोबर मळणी करून सुगीला विराम देत आहेत.