पडळकर वि. जयंतराव : संघर्षाची पूर्वपीठिका
राज्यकारण /शिवराज काटकर :
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच वैचारिक संघर्ष आणि वैयक्तिक हल्ले यांचा टकराव होत असतो, पण काहीवेळा तो मर्यादा ओलांडून जातो. अशीच एक घटना नुकतीच घडली, ज्यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अपमानास्पद आणि खालच्या पातळीची टीका केली. हे वादग्रस्त वक्तव्य सांगली जिल्ह्यातील जत येथे १८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या एका सभेत झाले. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत, आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि यातून पाटील कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आणि राज्यभरात राजकीय वादा-ची ठिणगी जोरदारपणे पडली. गेले दोन दिवस त्याचे पडसाद जिल्ह्या-सह राज्यभरात उमटत आहेत.
जत येथील एका शासकीय अभियंत्याने केलेल्या आत्महत्ये मागे पडळकर यांच्या सहाय्यकाचा हात असल्याचा आरोप करून महाविकारा आघाडीच्या रथानिक नेत्यांनी जत तालुक्यात आंदोलन हाती घेतले. वैशिष्ट्य म्हणजे पडळकर यांच्या विरोधातील या आंदोलनात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते ही आघाडीवर होते. त्या संतापातून पडळकर यांनी प्रति आव्हान दिले आणि ते जयंतरावांवर घसरले.
या वादाची मुळे जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात सापडतात. गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातील प्रस्थापितांना मागे टाकून पुढे आलेले नेतृत्व आहे आणि वेळोवेळी त्यांनी जयंत पाटलांना आव्हान दिले आहे. राजकीय कार्यकर्ता म्हणून मोठी ओळख नसतानाही त्यांनी जयंतरावांची गाडी अडवण्याचे कार्य २००४ पासून केले आहे. त्या प्रकरणात त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्जही केला होता. टेंभूच्या एका आंदोलनात तर दरोड्याचे गुन्हेही दाखल झाले. अशाच घटनांमधून संतापून त्यांनी यापूर्वी शरद पवार आणि अजित पवारांवरही अनेकदा वैयक्तिक टिका केली आहे. २०२१ मध्ये तर पडळकर यांनी जयंत पाटील आणि पवार कुटुंबावर हत्येच्या षडयंत्राचा आरोप करून वाद निर्माण केला होता. २०२३ मध्येही त्यांनी पाटील यांना फालतू माणूस म्हणून हिणवले होते. या पार्श्वभूमीवर नवे वक्तव्य आले तेव्हा तो केवळ वैयक्तिक हल्ला नव्हता, तर राजकीय रणनीतीचा भाग वाटला. त्याची गंभीर दखल शरद पवार यांनी घेतली आणि थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. पाठोपाठ पक्षाने राज्यभरात आंदोलने उभी केली. पुण्यात, इरलामपूरमध्ये आणि ठाण्यात पडळकरांची प्रतिमा जाळली गेली. पक्षाचे प्रवक्ते अनिश गावंडे यांनी पडळकरांना सतत अपराध करणारा संबोधले आणि त्यांच्या आमदारकीचा राजीनामा मागितला. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अपमान आहे. हे तेच आव्हाड होते ज्यांनी विधानसभेच्या लॉबीमध्ये पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून हाक मारली होती आणि त्यातून मोठे रामायण घडले होते ! फडणवीसांनी पडळकरांना समज दिली असे जाहीर करून अशी भाषा अरवीकारार्ह आहे, असे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाजपला कानपिचकी दिली, भाजपने आपल्या नेत्यांना शिस्त लावावी. काँग्रेस नेते सतेज पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनीही निषेध केला. रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून टीका केली, तर अमोल कोल्हे यांनी फडणवीसांना खुले पत्र लिहिले.
पडळकर मात्र ठाम आहेत. त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आणि मी राजकीय मुद्यांवर बोललो, वैयक्तिक नाही, असे सांगितले. त्यांच्या या भूमिकेने सत्ताधारी महायुतीत तणाव वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वादग्रस्त वक्तव्य महायुतीला नुकसान करू शकते, कारण ते ओबीसी-मराठा समाजांतील तणाव वाढवते. जयंत पाटील हे सहकार क्षेत्रातील राजारामबापू पाटील यांचे पुत्र म्हणून आदरास पात्र असून, त्यांची शांत स्वभावाची प्रतिमा आहे. ते या वादावर बोलण्यास तयार नाहीत, ज्यामुळे त्यांची राजकीय परिपक्वता उजळून निघाली आहे. एक प्रकारची सहानुभूती त्यांच्या बाजूने उभी राहते आहे हे लक्षात आल्यानंतर पडळकर यांनी आपण माफी मागणार नाही कारण नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीवर आर्टिफिशीयल व्हिडिओ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल माध्यमातून जहरी वक्तव्य केले त्यावेळी कोणी मोदी किंवा फडणवीस यांची समजूत घालण्यासाठी फोन केला नव्हता अशी टीका पवारांवर केली आहे. त्यामुळे पडळकर समर्थकांना बाजू मांडण्यास एक आधार मिळाला आहे.
आता हा संघर्ष केवळ दोन नेत्यांपुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. पुरोगामी राज्यात अशी भाषा लोकशाहीला कलंक आहे. पडळकरांच्या वक्तव्यावर भाजपने कारवाई करावी असा दबाव इतर पक्ष निर्माण करत आहेत. हा वाद निवडणुकांपर्यंत तापत राहील. स्थानिक पातळीवर विचार करता पडळकर यांच्या बाजूने भाजपमधील एकही नेता अद्याप उभा राहिला नाही. सोमवारी सांगलीत होणाऱ्या आंदोलनात खुद्द प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे राज्यातील नेते जयंतरावांच्या बाजूने सांगलीत सोमवारी आंदोलनात उभे राहणार आहेत हे विशेष!