ऑक्सफोर्डच्या विद्यार्थ्यांचे बसमध्ये वास्तव्य
घरभाड्याचा खर्च वाचविण्याचा प्रयत्न
ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे दोन विद्यार्थी घरभाडे भरता भरता इतके त्रस्त झाले की, त्यांनी एक जुनी बस खरेदी करत त्यालाच स्वत:चे घर करून सोडले आहे. 20 वर्षीय लियो बेवन आणि किट रेनशॉ आता याच बसमध्ये राहतात, त्यांनी ही बस फेसबुक मार्केटप्लेसवरून खरेदी केली होती. याच बसचा वापर कधीकाळी ब्रिटनमधील पॉप ग्रूप सुगाबेब्सने स्वत:च्या टूरसाठी केला होता. दोन्ही विद्यार्थी स्वत:च्या अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्यात आहेत, त्यांच्यासाठी घरभाड्याचा खर्च दरवर्षी 10 लाख ते 11 लाख रुपयांदरम्यान होता. पहिल्या वर्षी लियोला वसतिगृहासाठी 7500 पाउंड भरावे लागले होते, तर दुसऱ्या वर्षी त्याने एका घरात संयुक्तपणे राहण्यासाठी 6500 पाउंडचे भाडे भरले होते. अंतिम वर्षात 10 हजार युरोचे भाडे द्यावे लागणार होते, जे त्याच्यासाठी अशक्य होते, किटची स्थिती देखील जवळपास अशीच होती. पहिल्या दोन वर्षांमध्ये त्यांनी प्रत्येकी 4500 युरोचे भाडे भरले. अखेरच्या वर्षी त्यांच्याकडे 9 हजार युरोची मागणी करण्यात आली.
वसतिगृहात 8 जणांसोबत रहावे लागत असल्याने खासगीत्व मिळत नव्हते. तसेच त्यासाठीचा खर्च अधिक होता. अशास्थितीत जून महिन्यात फेसबुक मार्केटप्लेसवर केवळ 30 मिनिटात 5.9 लाख रुपयांमध्ये 44 फूट लांब बस खरेदी केली. बस चालविण्याच्या स्थितीत नव्हती, यामुळे ती लिव्हरपूल येथून ऑक्सफोर्डपर्यंत खेचत आणण्यासाठी 1.5 लाख रुपये खर्च करावे लागले. आता ही बस एका पार्किंग एरियात उभी करून 8690 रुपये प्रति आठवडा या दराने शुल्क भरतो. अशाप्रकारे आमचे वर्षभरात 2.9 लाख ते 4 लाख रुपये वाचत असल्याचे लियोने सांगितले.
बसमध्ये राहण्याचे आव्हान
बसला राहण्यायोग्य करण्यासाठी दोघांनी स्वत:च त्याची दुरुस्ती केली. दोघांनी सीट्स काढून टाकल्या. हीटिंग आणि कूलिंग सिस्टीमही हटविली. बसमधील वीजपुरवठ्यासाठी ते जनरेटर आणि बॅटरीचा वापर करणार आहेत. तर एलपीजी सिलिंडरचा वापर करत स्वयंपाक करणार आहेत. बसमध्ये राहणे आव्हानात्मक आहे, परंतु हा अनुभव मजेशीर देखील आहे, असे लियो आणि किटचे सांगणे आहे.