तुर्कीला भोवला स्वयंगोल, नेदरलँड्स उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ बर्लिन
नेदरलँड्सने पिछाडीवरून उसळी घेत तुर्कीचा 2-1 असा पराभव केला आणि युरोपियन चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. तुर्कस्तानसाठी सामेत अकायदिनने पहिल्या सत्रात हेडरवर गोल केल्यानंतर स्टीफन डी व्रीजने बरोबरी साधून दिली. त्यानंतर सहा मिनिटांनी म्हणजे 76 व्या मिनिटाला मेर्ट मुल्दूरने केलेला स्वयंगोल डच संघाला उपांत्य फेरीत पोहोचविण्यास पुरेसा ठरला.
6 फूट 5 इंच उंचीचा आघाडीपटू वाउट वेघॉर्स्टने दुसऱ्या सत्रामध्ये मैदानात प्रवेश केल्यानंतर नेदरलँड्सने खेळाला कलाटणी दिली. तुर्कीला बचावपटू मेरीह डेमिरलशिवाय खेळावे लागला. त्याला मंगळवारी ऑस्ट्रियावर 2-1 ने विजय मिळविताना आक्षेपार्ह हावभाव केल्याबद्दल दोन सामन्यांसाठी निलंबित केले होते. अकायदीनने 35 व्या मिनिटाला गोल करून तुर्कीने टाकलेल्या दबावाला फळ मिळवून दिले होते. ही पिछाडी भरून काढण्यासाठी डच संघाला भरपूर प्रयत्न करावे लागले. डी व्रीजने 70 व्या मिनिटाला डेपेच्या क्रॉसवर हेडर मारून हा गोल केला. त्यानंतर लगेच डच समर्थकांकडून तुर्कीच्या स्वयंगोलामुळे पुन्हा जल्लोष सुरू झाला.