तुमच्याकडून अपेक्षा नव्हती; जगदिश शेट्टर यांच्या प्रचारावरून ओवेसींची सोनिया गांधींवर टिका
कर्नाटकमध्ये भाजपचे बंडखोर आणि कॉंग्रेसचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी उपस्थिती लावली. यावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी कॉग्रेसवर निशाणा साधला आहे. हुबळी येथील रॅलीला संबोधित करताना ओवेसी यांनी काँग्रेसच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सोनिया गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) उमेदवाराचा प्रचार करतील ही अपेक्षा नव्हती असे म्हटले आहे.
आपल्या जाहीर सभेत बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “मॅडम सोनिया गांधीजी, तुम्ही एका आरएसएसच्या स्वयंसेवकासाठी प्रचार केला आहे. मला आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती. जगदीश शेट्टर हे राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत."
आपल्या भाषणात पुढे बोलताना ते म्हणाले "वैचारिक लढाईत काँग्रेस पुर्णपणे अपयशी ठरली आहे. ही खुपच शरमेची बाब असून कॉग्रेसचे विदूषक, नोकर, गुलाम माझ्यावर भारतीय जनता पक्षाची (भाजप) बी-टीम असल्याचा सतत आरोप करत असतात.” अशीही जहरी टिका त्यांनी केली.
काँग्रेसने हुबळी- धारवाड या मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी याच मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर मागील विधानसभा जिंकली होती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असलेले जगदीश शेट्टर आरएसएसशी संबंधित असूनही ते "धर्मनिरपेक्ष व्यक्ती" असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे.