थार रॉक्स वाहनाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
तासाभरात 1.76लाख गाड्या बुक : महिंद्राच्या थारची लोकप्रियता कायम
वृत्तसंस्था/ मुंबई
महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीची थार ही चारचाकी कार आपल्या वेगळेपणामुळे सध्या भारतीयांसाठी आकर्षणाचा विषय ठरली आहे. याच प्रकारातील थार रॉक्स हे नवे मॉडेल कंपनीने प्रदर्शित केले असून सदरची गाडी उपलब्ध होण्याआधीच ग्राहकांचा बुकिंगसाठी प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक तासातच 1.76 लाख ग्राहकांनी गाडी खरेदीसाठी बुक केली असल्याचे समजते.
थारच्या आगमनापासूनच भारतीयांमध्ये या गाडीविषयी कमालीचे आकर्षण दिसून आले आहे. आपल्या स्टेटस सिंबॉलसाठी ही गाडी खरेदी करणाऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसून आली आहे. महिंद्राच्या नव्या थार रॉक्स या गाडीच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे बुकिंगच्या पहिल्या दिवशी एक तासातच 1.76 लाख गाड्या ग्राहकांनी बुक केल्या आहेत. या योगे देशातील आघाडीवरच्या ऑटो कंपनीने बुकिंगमध्ये पहिल्याच दिवशी नवा विक्रम प्रस्थपित केल्याचे दिसून आले आहे.
कधी मिळणार ग्राहकांना कार
कंपनी सदरच्या नव्या वाहनांची डिलीव्हरी दसऱ्यालाच करणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढील तीन आठवड्याच्या कालावधीत बुकिंग केलेल्या ग्राहकांना थार रॉक्स ही गाडी टप्प्याटप्प्याने वितरीत केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले.
गाडीबाबत...
सदरची गाडी पाच दरवाजांची एसयुव्ही प्रकारातील असून पेट्रोल आणि डिझेल या इंधन पर्यायासह ती सादर केली गेली आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रकारात 2.0 लीटरचे इंजिन दिले गेले आहे. 6 स्पिड मॅन्युअल किंवा 6 स्पिड ऑटोमेटिक ट्रान्स्मीशन हा पर्यायही या गाडीत असणार आहे. पेट्रोल इंधनावरील गाडीची किंमत 12.99 लाखापासून सुरु होते आणि 22 लाखांपर्यंत ठेवण्यात आली आहे.