For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदेशातील रोजगार संधी आणि पडताळणी

06:31 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
विदेशातील रोजगार संधी आणि पडताळणी
Advertisement

आज जागतिक पातळीवर भारतीयांना शिक्षण, रोजगार व व्यवसाय या विविध क्षेत्रांमध्ये वाढत्या संधी उपलब्ध आहेत. या संधी जेवढ्या आकर्षक आहेत, तेवढ्याच त्या आव्हानपर सुद्धा असतात. क्वचित काही जणांची फसवणूक झाल्याची उदाहरणे समोर येतात व म्हणूनच विविध देशांमध्ये उपलब्ध असणाऱ्या वा होऊ घातलेल्या संधींची सर्वांगीण व मुळातून पडताळणी होणे कायम गरजेचे ठरते.

Advertisement

भारतीय नागरिकांनी विदेशात जाण्याचा निर्णय विचारपूर्वक व काळजीने घेण्यासाठी केंद्र सरकारतर्फे काही विशेष उपाययोजना करण्यात येते. यासंदर्भात  केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे नव्यानेच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार विदेशात रोजगारासाठी जाणाऱ्यांनी मान्यताप्राप्त मध्यस्थ वा सल्लागारांशीच संपर्क करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सरकारद्वारा केंद्रिय स्तरावर अशा प्रकारचे निर्देशवजा मार्गदर्शक तत्व जारी करण्याचे मुख्य कारण म्हणजे विविध प्रसंगी इच्छुक अर्जदार, उमेदवारांनी विदेशातील रोजगाराच्या आकर्षणापोटी अनधिकृत वा बेकायदेशीर सल्लागारांच्या नादी लागून त्यांची मोठी फसवणूक झाली होती.

केंद्र सरकारने आता हे पण स्पष्ट केले आहे की, केंद्र सरकारकडे नोंदणी नसणारे व संबंधित देशामध्ये उमेदवार पाठविण्याचा परवाना नसणारे रोजगार सल्लागार हे काम अधिकृतपणे व बेकायदेशीररित्या करीत असून देशवासियांनी व विशेषत: युवा विद्यार्थी, उमेदवारांनी त्यांच्या फसव्या भूलथापांना बळी पडू नये.

Advertisement

या संदर्भात असे पण लक्षात आले आहे की, औपचारिकपणे विदेशातील नोकरी-रोजगारांची जाहिरात देत असतानाच ही तथाकथित प्रस्थापित मंडळी हल्ली विविध समाज माध्यमे व समाज माध्यमांचासुद्धा उपयोग करून घेतात, असे दिसून आलेले आहे. त्यासाठी फेसबुक व्हॉटस्अपचा सर्रास व राजरोसपणे उपयोग केला जातो. या मध्यस्थांची अशा प्रकारची संवाद पद्धती व मांडणी पाहता चांगल्या चांगल्यांची फसगत होण्याचे प्रकार समोर येतच असतात. यासंदर्भात लक्षणीय बाब म्हणजे अनधिकृतपणे व दिशाभूल करून उमेदवारांची विदेशात नेमणूक करणे ही बाब 1983 च्या परदेशगमन कायद्याचे उल्लंघन करणारी व भारतीय नागरिकांना अनधिकृतपणे विदेशी नेणारी अशा दुहेरी स्वरुपात बेकायदेशीर ठरते.

त्यामुळे ज्या कुणाला सरकारी योजनेशिवाय म्हणजेच आपल्या स्वत:च्या प्रयत्नांतून विदेशात जायचे असेल व त्यांना खासगी रोजगार मार्गदर्शक वा सल्लागाराची मदत घ्यायची असेल तर त्यांनी संबंधित सल्लागार हा केंद्र सरकारतर्फे  अधिकृत  व मान्यताप्राप्त असल्याचा पडताळा आवश्य करून घ्यावा. सरकारी अधिसूचनेनुसार भारतीय उमेदवारांना विदेशात पाठविण्याचा अधिकृत परवाना असणाऱ्या आंतरराष्ट्रीय परवानाधारक रोजगार सल्लागारांना केंद्र सरकारतर्फे विशेष परवाना क्रमांक देण्यात येतो व हा परवाना क्रमांक त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये सर्वांना दिसेल अशा प्रकारे व ठळकपणे लावणे त्यांच्यावर बंधनकारक असते.

याशिवाय विशेष काळजी घेण्याच्या उद्देशाने संबंधित रोजगार सल्लागार सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर उमेदवारांना पाठविण्यासाठी अधिकृतपणे व मान्यताप्राप्त आहेत किंवा नाहीत याची पडताळणी घेण्यासाठी उमेदवार अथवा त्यांच्या पालकांनी केंद्र सरकारच्या  www.emigrate.gov.in या संकेतस्थळाच्या मान्यताप्राप्त रोजगार सल्लागार यादीची व त्यातील नावांची आवश्य पडताळणी करावी, म्हणजे त्यांची फसगत होणार नाही.

विदेशातील नोकर-रोजगाराच्या संदर्भात काही मुलभूत व महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी आणि पूर्तता महत्त्वाची ठरते. यामध्ये सुस्पष्ट व निर्धारित तपशीलासह असणारे नेमणूक पत्र विशेष महत्त्वाचे ठरते. या कागदपत्रांवर विदेशातील संबंधित कंपनी अथवा संस्था, अधिकृत रोजगार मार्गदर्शक व उमेदवार यांच्या स्वाक्षऱ्या असणे अनिवार्य व कायद्याने बंधनकारक असते.

नियुक्तीपत्रातील महत्त्वाच्या तपशिलासंदर्भात सांगायचे म्हणजे त्यामध्ये उमेदवाराच्या नियुक्तीची माहिती व तपशील, कामाचे स्वरुप व पद्धती, वेतन व फायदे, अप्रत्यक्ष आर्थिक लाभ हा तपशील असणे आवश्यक आहे. याशिवाय विदेशातील या नेमणूकपत्रात विहित प्रक्रियेअंतर्गत संबंधित उमेदवाराची निवड करण्यासाठी त्याच्याकडे असणारी कौशल्य पात्रता, पूर्वानुभव, नागरिकत्व विषयक दाखले, संबंधित देशात नोकरी, रोजगार करण्यासाठीचा परवाना पासपोर्ट-व्हिसा, विदेशी चलन, आवश्यक तो विमा इ. असणे अनिवार्य केले आहे.

सरकारतर्फे आपल्या याच प्रयत्नांचा एक आवश्यक भाग म्हणून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्यावतीने आंतरराष्ट्रीय रोजगार कौशल्य  मार्गदर्शक पद्धती विकसित करण्यात आली आहे. संगणकीय पद्धतीने त्याचा वापर करणे शक्य व्हावे यासाठी 20 एप्रिल 2022 रोजी ‘नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल’ विशेष पद्धतीने तयार करण्यात आले असून त्याचा उपयोग केला जात आहे.

याशिवाय भारतीय युवा विद्यार्थ्यांना परदेशी रोजगारासाठी जाता यावे यासाठी प्रवासी कौशल विकास योजना आणि इच्छुक उमेदवारांसाठी विदेशात रोजगारासाठी जाण्यापूर्वी विदेशी रोजगारपूर्व मार्गदर्शन पद्धती विकसित करण्यात आली असून त्यामध्ये मुख्यत: पुढील मुद्यांचा समावेश आहे.

विदेशातील नोकरी-रोजगाराच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय व उभय देश, उमेदवार व त्यांची नेमणूक करणारी कंपनी यांनी कायदेशीर बाबी आणि तरतुदींची पूर्णपणे पूर्तता केलेली असावी.

संबंधित देशात विशिष्ट रोजगारासाठी व निर्धारित कालावधीसाठी उमेदवार जात असल्याचे स्पष्ट करावे.

विदेशात रवाना होण्यापूर्वी आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या केलेल्या असाव्यात.

उमेदवार ज्या देशात जाणार असतील त्या देशाच्या मुख्य प्रथा परंपरा व कायद्यांचे ज्ञान करून घेणे.

तेथील दैनंदिन जीवनपद्धतींचा परिचय करून घेणे.

संबंधित देशातील भारतीय दूतावास व तेथील अधिकारी यांच्याशी संपर्क प्रस्थापित करणे व तो कायम ठेवणे.

काही विशेष परिस्थिती वा आपत्कालीन स्थितीमध्ये संबंधित दूतावासाचे मार्गदर्शक निर्णय पाळणे.

उमेदवाराच्या नोकरी रोजगाराच्या कालावधीची पूर्तता झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी घेण्याच्या खबरदारीची माहिती करून घेणे व त्यासाठी आवश्यक असा परतीचा परवाना मिळविणे इ.

आज नोकरी, रोजगार, व्यवसायाच्या निमित्ताने जगातील विविध देशांमध्ये गेलेल्या भारतीयांची संख्या सुमारे 3कोटी असून त्यामध्ये सुमारे सव्वा कोटी अप्रवासी भारतीयांचा समावेश आहे. त्याशिवाय दीड कोटीहून अधिक भारतीयांनी विविध देशांचे नागरिकत्व घेतले आहे. भारत आणि भारतीय यांचे विविध क्षेत्रातील कर्तृत्व आणि प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी बोलकी असून त्यामध्ये सातत्याने भर पडत आहे. असे होत असताना नव्याने वा प्रथमच नोकरी रोजगारासाठी विदेशात जाणाऱ्या भारतीयांनी देश विदेशाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करणे त्यांच्याच हिताचे ठरणारे आहे.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.