ऐतिहासिक कळंबा तलाव पहिल्यांदाच ओव्हरफ्लो : तलावाची पाणी पातळी सत्तावीस फुटांवर
: कळंबा तलावावर बघ्यांची गर्दी
सागर पाटील कळंबा :
गेले आठ दिवस सुरू असणाऱ्या संतात धार पावसाने बुधवारी सकाळ पासूनच शहरालगत असणारा ऐतिहासिक कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने तलावावर नागरिकांची गर्दी केली आहे.
तलाव ओसंडून वाहू लागल्याचे हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी व पावसात भिजण्यासाठी हौशी पर्यटकांसह कळंबा ग्रामस्थांनीही कळंबा तलावावर मोठी गर्दी केली होती. गेल्या चार दिवसंपासून झालेल्या दमदार पावसाने अवघ्या चार फुटांवर असणारी पाणीपातळी पावसाने ती सव्वीस फुटांवर पोहोचली होती. पावसाचा जोर कायम असल्याने तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. बेसुमार पाणी उपशामुळे एप्रिल ते मे मध्ये तलावाचे पात्र कोरडे पडले होते. पाणी पातळीत मोठी घट झाली होती. गेल्या चार दिवसंपासून पावसाने हाजरी लावल्याने तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहण्याची शहरासह कळंबा ग्रामस्थांना आस लागली होती. मात्र, गेले चारदिवस असणाऱ्या पावसामुळे तलावाचे मुख्य स्तोत्र असणाऱ्या कात्यायनी टेकड्यातून वाहणारे सात नैसर्गिक नाले - ओढे दुतोंडी भरून ओसंडून वाहू लागल्याने अखेर कळंबा तलावाची पाणी पातळी वाढ होऊन ती सत्तावीस फुटांवर पोचली असून बुधवारी सकाळी तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला. तलावाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटनाचा वाढता ओघ लक्षात घेता कळंबा तलावावर गर्दी होण्याची शक्यता आहे. सांडव्यानजीकचा पूल कमकुवत झाला आहे. तलावाचा बंधारा खचला असून पदपथ निसरडा बनला आहे. तलाव परिसरात पथदिवे नसल्याने परिसरात अंधार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधता बाळगण्याचा इशारा पालिका प्रशासन कळंबा ग्रामपंचायत, करवीर पोलीस प्रशासनाने दिला आहे.