जिल्ह्यात ज्येष्ठ पेन्शन योजनेंतर्गत 4 लाख 88 हजारांवर लाभार्थी
वृद्धाप पेन्शन 1 लाख 21 हजार तर संध्या सुरक्षा योजनेंतर्गत 3 लाख 67 हजार लाभार्थी
बेळगाव : निराधार, विधवा, वयोवृद्ध, दिव्यांग यांना जीवन जपताना आर्थिक स्थैर्य मिळावे, या उद्देशाने राज्य व केंद्र सरकारने पेन्शन योजना सुरू केली होते. या योजनेतून पेन्शन दिली जात आहे. यामुळे गरीब कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येत असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले जात आहे. जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धाप पेन्शन व संध्या सुरक्षा योजनेंतर्गंत 4 लाख 88 हजार 862 लाभार्थी लाभ घेत आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धाप पेन्शन अंतर्गत 1 लाख 21 हजार 652 तर संध्या सुरक्षा योजनेंतर्गत 3 लाख 67 हजार 210 लाभार्थी आहेत. वृद्धापकाळात गरीब असलेल्या वृद्धांच्या आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने राज्य व केंद्र सरकारकडून विविध योजना राबविण्यात येतात. वृद्धापकाळात ज्येष्ठांना उदरनिर्वाहसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते. तसेच घरातून किंवा बाहेरून मदत मिळाली नाही तर त्यांना दोन वेळचे जेवणदेखील मिळणे कठीण बनते. यामुळे ज्येष्ठांना वृद्धापकाळात कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नयेत, यासाठी पेन्शन योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. यातून ज्येष्ठांना आपला उदरनिर्वाह करणे सोपे होणार आहे.
ज्येष्ठांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या गरजा भगविणे व समाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने 60 वर्षांवरील नागरिकांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धाप पेन्शन योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत 1 लाख 21 हजार 652 लाभार्थी असून सर्वाधिक बेळगाव तालुक्यात 32 हजार 642 आहेत. तर सर्वात कमी यरगट्टी तालुक्यात 1252 आहेत. पात्र लाभार्थ्यांना मासिक पेन्शन मिळत असून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. यातून ते गरजा पूर्ण करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्यांना कठीण काळात मदत करण्याच्या दृष्टीने संध्या सुरक्षा योजना लागू केली आहे. पात्र लाभार्थ्यांना मासिक पेन्शन मिळत असून त्यांना सार्वजनिक बस सवलत, स्वयंसेवा संस्थांच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधांसह इतर लाभही मिळत आहेत. या योजनेंतर्गत 65 वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्ती सुविधा मिळवत आहेत. जिल्ह्यात संध्या सुरक्षा योजनेंतर्गत 3 लाख 67 हजार 210 लाभार्थी असून सर्वाधिक बेळगाव तालुक्यात 94 हजार 562 तर सर्वात कमी यरगट्टी तालुक्यात 6 हजार 18 लाभार्थी आहेत.