उत्कृष्ट झांज वादक बाळाजी गवळी यांचे निधन
हेळेकर दशावतार नाट्य मंडळाचे झांज वादक
ओटवणे प्रतिनिधी
कारिवडे येथील हेळेकर दशावतार नाट्य मंडळाचे उत्कृष्ट झांज वादक बाळाजी कमलाकर गवळी (५६) यांचे सोमवारी रात्री ८ वाजता निधन झाले. बाळाजी गवळी सुरुवातीला रिक्षा चालवीत होते. कारिवडे सोसायटीचे संचालक असलेल्या बाळाजी गवळी यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असायचा. गवळी समाजासाठी ही त्यांनी आपले योगदान दिले होते. लहानपणापासूनच त्यांना भजन आणि दशावतार केलेची आवड असल्याने ते दशावतारातील झांज वादनाकडे वळले. हेळेकर दशावतार नाट्य मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. या दशावतार नाट्य मंडळात त्यांनी १० वर्षे झांज वादक म्हणून सेवा बजावली. दशावतारातील उत्कृष्ट झांज वादक म्हणून त्यांचा अनेक ठिकाणी गौरव झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत गवळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. मंगळवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील रोशन गवळी यांचे ते वडील होत तर निवृत्त मुख्याध्यापक कै. कमलाकर गवळी गुरुजी यांचे ते जेष्ठ सुपुत्र होत. त्यांच्या पश्चात आई, मुलगा, मुलगी, सुन, भाऊ, पुतणे, जावई, नातवंडे असा परिवार आहे.