For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपला विजय हा कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फळ

02:54 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
आपला विजय हा कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फळ
Advertisement

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे भावोद्गार, पर्वरी मतदारसंघ कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री खंवटे यांच्याहस्ते सत्कार 

Advertisement

पणजी : लोकसभा निवडणुकीतील आपल्या विजयात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचेच सर्वाधिक योगदान असल्याचे भावोद्गार उत्तर गोवा खासदार व केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे काढले. भारतीय जनता पक्षाच्या पर्वरी मतदारसंघ मंडळाने आयोजित केलेल्या कार्यकर्ता संमेलनात सत्कार स्वीकारल्यानंतर मार्गदर्शन करताना नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यसभा खासदार व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, पर्यटन व माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे, सुकूरच्या सरपंच सोनिया पेडणेकर,पेन्ह द फ्रान्सचे सरपंच स्वप्नील चोडणकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता गुपेश नाईक, पर्वरी मंडळ प्रभारी रूपेश कामत व पंचसदस्य उपस्थित होते. देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाची लाट होती.अशा वेळी कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह संचारला होता, त्यातून त्यांची मेहनत फळास आल्याचे नाईक म्हणाले. उमेदवाराचा विजय हा कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फळ असते व ते 2024च्या निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. पर्वरी मतदारसंघात श्रीपाद नाईक यांना बार्देश तालुक्यातील सात मतदारसंघामधून सर्वांत मोठी आघाडी मिळाली. बार्देश तालुक्यातून त्यांना जे 22 हजारांचे मताध्क्यि मिळाले त्यातील सुमारे 5 हजार 800 मताध्क्यि हे एकट्या पर्वरीतून होते, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी नमूद केले.

कार्यकर्त्यांनी मनावर घेतले की, ‘जिंकू किंवा मरू’अशा भावनेने त्यांचे काम असते, असे सांगून भाऊंच्या विजयासाठी अहोरात्र झटलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा राज्यात आणण्यासाठी आमचा प्रयत्न असेल,अशी ग्वाहीही त्यांनी दिली. खासदार तथा भाजपचे प्रदेश अध्यक्ष तानावडे यांनीही भाजपाच्या कार्यकर्त्यांचे तोंडभर कौतुक केले.उत्तर गोव्यात तर भाऊंना विक्रमी मताधिक्य मिळाल्याचे सांगून त्यांच्या प्रचंड आघाडीने टीका करणाऱ्या विरोधकांची बोलतीच बंद केल्याची खोचक टिपणी त्यांनी केली.कार्यकर्त्यांचे श्रमाचा हा विजय असून भविष्यात अशीच साथ व  सहकार्य भाजपला द्या,असे आवाहन त्यांनी केले. सबका साथ, सबका विकास और सबका प्रयास हा मंत्र जोपासून गोव्याच्या सर्वांगीण  विकासासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे अभिवचन तानावडे यांनी दिले. तत्पूर्वी निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल श्रीपाद नाईक व तानावडे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन व हार घालून खंवटे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे  फुलांची परडी देऊन स्वागत करण्यात आले. सरपंच सोनिया पेडणेकर, सरपंच स्वप्नील चोडणकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक यांनी देखील यावेळी कार्यकर्त्यांच्या गौरवपर विचार मांडले. सूत्रसंचालन गोकुळदास गावडे यांनी केले तर पंचसदस्य रिना फर्नांडिस  यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.