For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आमची शाळा, आमची जबाबदारी’ महत्त्वाकांक्षी उपक्रम

11:25 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आमची शाळा  आमची जबाबदारी’ महत्त्वाकांक्षी उपक्रम
Advertisement

देणगीदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन : सुवर्ण विधानसौधमध्ये लोगोचे अनावरण

Advertisement

बेळगाव : सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या हेतूने ‘आमची शाळा, आमची जबाबदारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. देणगीदारांनी सरकारसोबत शाळांच्या सुधारणेसाठी काम केल्यास सरकारी शाळा चांगले विद्यार्थी घडवू शकतात, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी केले. बुधवारी बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते ‘आमची शाळा, आमची जबाबदारी’ या कार्यक्रमाच्या लोगोचे अनावरण व देणगीदारांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. ते म्हणाले,

राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये एकूण 56 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षापासून एसएसएलसी परीक्षा तीन वेळा घेण्यात आली असून 77 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण होत महाविद्यालयात प्रवेश घेतला. शालेय मुलांना पौष्टिक आहारासोबत चांगले शिक्षण देण्याचे ध्येय असून या पार्श्वभूमीवर अझीम प्रेमजी फाऊंडेशनच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना आठवड्यातून सहा दिवस अंडी वाटपाचा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 25 सप्टेंबर रोजी यादगिर येथून या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.

Advertisement

सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने 45 हजार अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी एकूण 1008 एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. नीट व सीईटी कोचिंगसाठी सरकारी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पगारातून दहा लाख रुपये त्यांनी शिक्षण घेतलेल्या सिद्धरामगुंडी येथील सरकारी शाळेला दिले. त्याची प्रेरणा घेत इतरांनीही सरकारी शाळांना मदत केल्यास दर्जा वाढविणे सहज शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, सरकारी शाळांमध्ये उत्तम शिक्षण देण्यासाठीचा हा उपक्रम आहे. हा उपक्रम केवळ कार्यक्रमापुरता राहू नये तर यामध्ये सर्वांनी आपले योगदान द्यावे. शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्वांनी एकत्रितरीत्या प्रयत्न केल्यास सरकारी शाळा उत्तम दर्जाच्या होऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कर्नाटक सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, आमदार राजू सेठ, महांतेश कौजलगी, विठ्ठल हलगेकर, विश्वास वैद्य, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, लक्ष्मी गजपती, महादेवी पाटील, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राकेशकुमार सिंग, शिक्षण आयुक्त कावेरी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, शिक्षण विभागाच्या उपायुक्त जयश्री शिंत्रे यांच्यासह इतर उपस्थित होते.

शिक्षणमंत्र्यांचे विद्यार्थ्यांसमवेत भोजन

सुवर्ण विधानसौध येथे ‘आमची शाळा, आमची जबाबदारी’ या उपक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी विद्यार्थ्यांसमवेत दुपारचे भोजन केले. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसमवेत भोजन करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षण घेताना त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा आदर्श व्यक्तिमत्त्व!

माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा हे आपले आदर्श आहेत, असे सांगत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बंगारप्पांबद्दलची भावना व्यक्त केली. शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांचे वडील एस. बंगारप्पा यांच्यासोबत आम्ही राजकीय जीवनाला सुरुवात केली. त्यांना पाहण्याची उत्सुकता होती. त्यांचे रुबाबदार कपडे, गॉगल, त्यांची लाईफस्टाईल बघणेच छान वाटायचे. ते एक कलरफुल राजकारणी होते. राज्याच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. ते आदर्श व्यक्तिमत्त्व होते. प्रचार न करताच ते निवडून यायचे. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून 2018 च्या निवडणुकीत प्रचार न करताच विजय मिळविल्याचे सांगत त्यांच्याप्रमाणेच आहार-विहाराची सांगड घातल्याचेही सतीश जारकीहोळी यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Tags :

.