For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भूतान-चीन सीमा चर्चेवर आमची नजर : सैन्यप्रमुख

07:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
भूतान चीन सीमा चर्चेवर आमची नजर   सैन्यप्रमुख
Advertisement

भारत-म्यानमार सीमेवरील स्थितीही चिंताजनक : मणिपूरमध्ये घुसखोरी होण्याचा धोका

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती स्थिर असली तरीही संवेदनशील आहे. जम्मू-काश्मीरमध्ये छद्मयुद्धाद्वारे शत्रू वातावरण बिघडवू पाहत आहे. तसेच भूतान आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या सीमाचर्चेवर आमची नजर असल्याचे वक्तव्य सैन्यप्रमुख मनोज पांडे यांनी गुरुवारी केले आहे. म्यानमारमधून तेथील सैनिक आणि सशस्त्र बंडखोरांकडून घुसखोरीचे प्रयत्न होत असल्याने त्या सीमेवरील स्थिती चिंताजनक असल्याचे सैन्यप्रमुखांनी नमूद पेल्s आहे. भूतान आणि चीन यांच्यात सीमेवरून वाद असून यात डोकलामचे क्षेत्र देखील सामील आहे. डोकलाम एक ट्राय-जंक्शन असून तेथे भारत, चीन आणि भूतानच्या सीमा लागून आहेत. भारत आणि चीन यांच्यात 2017 मध्ये डोकलामवरून वाद देखील झाला आहे. डोकलामचा भाग हा भारतातील चिकननेक म्हणून घेणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉरपासून नजीक आहे. याचमुळे भारतासाठी डोकलामचा भाग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो.

Advertisement

अग्निवीरांच्या पहिल्या दोन तुकड्या फील्ड युनिटमध्ये तैनात होण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत आणि त्यांच्यासंबंधीचा फीडबॅक अत्यंत चांगला आणि उत्साहजनक आहे. 120 महिला अधिकाऱ्यांनाही कमांड भूमिकेत स्थायी कमिशन देण्यात आले आहे तसेच फील्ड एरियात त्यांना तैनात करण्यात आले असल्याची माहिती सैन्यप्रमुख मनोज पांडे यांनी दिली आहे. भारत-म्यानमार सीमेची स्थिती देखील आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. मागील काही महिन्यांमध्ये म्यानमार सैन्य आणि सशस्त्र संघटनांच्या हालचालींबद्दल आम्ही जाणून आहोत. म्यानमारचे काही नागरिक देखील मिझोरमसोबत मणिपूरमध्ये आश्रय घेत आहेत. म्यानमारमधील काही बंडखोर समूह दबावामुळे मणिपूरच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची स्थितीवर नजर असून आसाम रायफल्सला यासंबंधी अलर्ट करण्यात आले आहे. सीमेवरील कुंपण देखील मजबूत करण्याचा विचार केला जात असल्याचे सैन्यप्रमुखांनी म्हटले आहे.

ईशान्येतील स्थितीत सुधारणा

मागील वर्षात ईशान्येतील स्थिती सुधारली असून याकरता सरकारकडून आखण्यात आलेली धोरणे कारणीभूत आहेत. हिंसेच्या घटना कमी झाल्या आहेत. मणिपूरमध्ये मे महिन्यात हिंसा झाली होती, परंतु राज्य सरकार, सैन्य आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त प्रयत्नांमुळे स्थिती सध्या स्थिर आहे. आम्ही स्थिती सुरळीत करण्यासाठी काम करत आहोत. आमचा देश आर्थिक प्रगतीच्या मार्गावर मजबुतीने वाटचाल करत आहे. आम्ही देखील आमच्या देशाच्या प्रगतीसाठी अंतर्गत आणि बर्हिगत दोन्ही मोर्चांवर पूर्णपणे स्थायी आणि सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत असे उद्गार पांडे यांनी काढले आहेत.

राजौरी अन् पुंछमध्ये वाढल्या दहशतवादी घटना

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी कायम आहे, परंतु घुसखोरीचे प्रयत्न होत असले तरीही ते आम्ही उधळून लावत आहोत. आम्ही मजबूत ड्रोनविरोधी यंत्रणा तयार केली असून याच्या माध्यमातून ड्रोनद्वारे सीमापार शस्त्रास्त्र आणि अमली पदार्थांची तस्करी होऊ न देण्याचा प्रयत्न आहे. राजौरी आणि पुंछच्या भागांमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. आमच्या उत्तर सीमेवर स्थिती स्थिर परंतु तणावपूर्ण आहे. आम्ही सातत्याने चर्चेद्वारे मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही मोहिमात्मक तयारी अत्यंत चांगली आहे. तैनाती देखील नियंत्रित आणि विस्तृत असल्याचे सैन्यप्रमुखांनी नमूद केले आहे.

2027 पर्यंत लाखाने कमी होणार सैन्याचे मनुष्यबळ : सैन्यप्रमुख पांडे यांनी दिली माहिती

भारतीय सैन्यात 2027 पर्यंत 1 लाख सैनिक कमी होणार आहेत. याची प्रक्रिया सुमारे चार वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आली होती. त्यावेळी संसदेच्या संरक्षण विषयक स्थायी समितीला तत्कालीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीसी)ने याची माहिती दिली होती. सैन्यात ऑप्टिमायजेशनची (योग्यप्रकारे पूर्ण वापर) प्रक्रिया सुरू असून 2027 पर्यंत ती पूर्ण होणार आहे. म्हणजेच तोपर्यंत सैन्यात 1 लाख सैनिक कमी होणार असल्याचे सैन्यप्रमुख मनोज पांडे यांनी सांगितले आहे. ऑप्टिमायजेशनच्या प्रक्रियेच्या अंतर्गत अनेक युनिट्स कमी केल्या जात आहेत. आम्ही अॅनिमल ट्रान्सपोर्ट युनिट कमी करणे पूर्वीच सुरू केले होते, कारण आता अॅनिमल ट्रान्सपोर्टच्या जागी लॉजिस्टिक ड्रोन, ऑल टेरेन व्हेईकलचा वापर होत आहे. अशाच प्रकारे फूड इन्स्पेक्शन युनिट आणि फूड लॅबमधील बहुतांश मनुष्यबळ आम्ही कमी केले आहे. भविष्यात त्यांना पूर्णपणे बंद करणार आहोत. फूड इन्स्पेक्शनसाठी बाहेरील स्ट्रक्चरचा वापर केला जाणार आहे.  आम्ही ऑप्टिमायजेनशची योजना आखली होती आणि ती टप्पाबद्धत अंमलात आणत आहोत. 2027 पर्यंत आम्ही ती पूर्ण करणार आहोत. म्हणजेच तोपर्यंत सुमारे 1 लाख सैनिक कमी होणार असल्याचे सैन्यप्रमुख पांडे म्हणाले.

सुमारे 4 वर्षांपूर्वी संसदेच्या स्थायी समितीला सैन्याच्या ‘टूथ टू नेल’ रेशियोविषयी सांगण्यात आले होते. सैन्यमोहिमांमध्ये भाग घेणारे आणि त्यांच्यासाठी रसद इत्यादी पोहोचविणाऱ्या सैनिकांमधील गुणोत्तराला टूथ टू टेल रेशियो म्हटले जाते. जर टेल म्हणजे थेट सैन्यमोहिमेत भाग न घेणाऱ्या सैनिकांची संख्या अधिक असेल तर प्रत्यक्ष सैन्यमोहिमेसाठी आवश्यक सैनिकांच्या संख्येत घट होत जाते. याचमुळे सैन्यमोहिमांसाठी आवश्यक सैनिकांची संख्या अधिक राखायची असल्यास टेल कमी करावा लागणार आहे. 3-4 वर्षांत मनुष्यबळ सुमारे 1 लाखाने कमी करण्याचे लक्ष्य असल्याचे संसदीय स्थायी समितीला एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगण्यात आले होते. जनरल व्ही. पी. मलिक हे सैन्यप्रमुख असताना त्यांनी 50 हजार सैनिक कमी करण्याचा विचार मांडला होता. परंतु आता मनुष्यबळ सुमारे 1 लाखाने कमी करण्याचे लक्ष्य आहे. यामुळे वाचणारा निधी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी खर्च केला जाणार आहे. सरकारने देखील सैन्याला या रकमेचा तंत्रज्ञानासाठी वापर करण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement
Tags :

.