अनंत अमुचि ध्येयासक्ती...
जीवाची पर्वा न करणाऱ्या हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना सलाम!
सुशांत कुरंगी, बेळगाव
एखादा उत्सव किंवा समारंभ सुरू असतो. हौसमौजेला उधाण आलेले असते. वातावरण जल्लोषी असते. आणि अचानक वीज खंडित होते. झाले.... हेस्कॉमच्या नावाने शिमगा सुरू होतो. परंतु हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना कोणती कसरत करावी लागते, याची कल्पनाही आपण करत नाही. ऊन असो पाऊस असो, झाड पडो, अपघात होवो, हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना धावावेच लागते. आणि प्रसंगी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पूर्ण करावे लागते. अशावेळी काही दुर्धर प्रसंग ओढवतात. अवयव निकामी होतात. तरीसुद्धा ‘अनंत अमुचि ध्येयासक्ती, किनारा तुला पामराला’ असे म्हणत ते कार्यरत आहेत. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी परिस्थिती हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांवर नेहमीच येते. प्रत्येकवेळी आयुष्य दुसरी संधी देते, परंतु विजेचा धक्का लागला तर मात्र आयुष्याची दुसरी संधी मिळेलच याची शाश्वती नाही. 220 व्होल्ट इतक्या उच्च विद्युतभारित वाहिन्यांवर दुरुस्तीची कामे करावी लागतात. ज्या विद्युत वाहिन्या 4 ते 5 फुटावरून सहज मनुष्याला ओढून घेऊ शकतात. अशा ठिकाणीही जीव धोक्यात घालून हेस्कॉमचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करत 24 तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी कार्यरत असतात. परंतु अशावेळी केव्हा ना केव्हा अपघात हा होतोच.
उच्च विद्युतभाराचा धक्का लागल्यास क्षणभरातच मृत्यूला सामोरे जावे लागते. तरी देखील काही कर्मचारी या अपघातातून बचावतात. परंतु त्यांचे अवयव मात्र कायमस्वरुपी निकामी होतात. हेस्कॉमच्या बेळगाव विभागातसुद्धा विजेचा धक्का लागून कित्येक विद्युत कर्मचाऱ्यांचे हात निकामी झाले आहेत. तर काहीच्या डोक्याला, पोटाला, पायालाही गंभीर इजा झाल्या आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांना हेस्कॉमने घरी न बसवता त्यांना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्युत खांबावर चढून दुरुस्ती करणे शक्य नसले तरी कार्यालयात ‘डाटा एंट्री ऑपरेटर’ अथवा इतर कार्यालयीन कामकाज त्या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. कर्मचाऱ्याला मोठा अपघात झाला की, त्याला घरी बसण्याचा सल्ला दिला जातो. आधीच अपघाताने ग्रासलेला कर्मचारी घरी राहण्याच्या चिंतेने अजूनच खचतो. हे टाळण्यासाठी हेस्कॉमने अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांची जबाबदारी न झटकता त्यांना कामावर घेतले आहे. त्याचबरोबर अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर रुजू करून घेतले आहे.
हेस्कॉमकडून कर्मचाऱ्यांच्या वेदनावर माणुसकीची फुंकर
विजेचा जबर धक्का बसल्यामुळे बेळगाव विभागातील 7 कर्मचाऱ्यांचे शरीराचे काही भाग निकामी झाले आहेत. काही जणांचे हात तर काही जणांच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. या कर्मचाऱ्यांना हेस्कॉमने विविध कार्यालयीन कामे सोपविली आहेत. त्यामुळे एका हाताने हे कर्मचारी ऑनलाईन बिल काढणे, डाटा अपडेट करणे अशी कामे करत आहेत. त्याचबरोबर तिघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देऊन हेस्कॉम विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेदनावर माणुसकीची फुंकर घातली आहे.
विभागीय कार्यालयात नवी जबाबदारी
2016 मध्ये बिडी (खानापूर) विभागात दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा जबर धक्का बसला. यामुळे अनेक भागांना इजा झाली. लाईनमन म्हणून काम करणे शक्य नसल्याने बेळगावच्या हेस्कॉम विभागीय कार्यालयात नवीन जबाबदारी देण्यात आली. सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागणारे कागदपत्र पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
-रमेश मलनायक (अपघातग्रस्त कर्मचारी)
एसटीएमआर विभागात सेवा
खानापूर तालुक्यातील बिडी विभागात 2021 मध्ये मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेत दुखापत झाल्याने पुन्हा त्या ठिकाणी काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे हेस्कॉम प्रशासनाने मला एसटीएमआर विभागात सेवा बजावण्याची संधी दिली आहे. सध्या मी नेहरुनगर येथील मिटर टेस्टिंग विभागात सेवा बजावत आहे.
-तिप्पेस्वामी आर. (अपघातग्रस्त हेस्कॉम कर्मचारी)
कर्मचाऱ्यांच्या पाठीशी हेस्कॉम प्रशासन खंबीरपणे
कोणताही विद्युत अपघात होऊ नये, यासाठी हेस्कॉमकडून सर्व खबरदारी घेतली जाते. एखाद्यावेळीस नजर चुकीने अपघात झाल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी हेस्कॉम प्रशासन खंबीरपणे उभे राहते. त्यामुळेच मोठे विद्युत अपघात झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज देण्यात आले आहे.
- विनोद करुर (कार्यकारी अभियंता हेस्कॉम ग्रामीण)
