ओटवणे मुख्य रस्त्यावरील माती ग्रामस्थांच्या पुढाकारातून दूर
रस्त्यावर माती आल्याने रस्ता बनला होता वाहतुकीस धोकादायक
ओटवणे प्रतिनिधी
चराठा - ओटवणे मुख्य मार्गादरम्यान धोकादायक वळणावरील रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती आल्यामुळे हे वळण वाहतुकीस धोकादायक बनले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर ओटवणे मांडवफातरवाडीतील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. या ग्रामस्थांनी या धोकादायक वळणावरील माती काढून हा रस्ता वाहतूक सुरळीत केला.या धोकादायक वळणावरील रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहाबरोबर ही माती आल्यामुळे दुचाकी गाड्या घसरुन अनेक अपघात झाले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अनेक वेळा लक्षवेधुनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच ओटवणे मांडवफातरवाडीतील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन रस्त्यावर आलेली ही माती दूर केली.या श्रमदानात प्रकाश पनासे, मिलिंद म्हापसेकर, अनिल रेडकर, अवधुत भगत, समीर गोडकर, उमेश परब, विजय पनासे, सुभाष राणे, गजानन तावडे, दिलीप हरीचंद्र वारंग, दिलीप अर्जुन वारंग यांनी सहभाग घेतला.