ओटवणे भानसे टेंब येथील कृषी पंपाना ओटवणे गावातून वीज द्यावी
शेतकरी व बागायतदारांची सहाय्यक वीज उपअभियंत्याकडे मागणी
ओटवणे | प्रतिनिधी
ओटवणे देऊळवाडी भानसे टेंब येथील कृषी पंपाना सरमळे गावातून विज पुरवठा केल्यामुळे सुरळीत पुरवठा होत नाही. याचा फटका शेतकऱ्यांसह बागायतदारांना बसतो. त्यामुळे या कृषी पंपांना नविन विज वाहिनी टाकून ओटवणे गावातून वीजपुरवठा करावा अशी मागणी या वाडीतील शेतकरी व बागायतदारांनी सावंतवाडीचे सहाय्यक वीज उपअभियंता सुशांत शिवणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. ओटवणे देऊळवाडीतील भानसे टेंब येथील कृषी पंपांना सरमळे गावातून विजपूरवठा केला जातो. मात्र ही वीज वाहिनी जंगल भागातून तसेच तेरेखोल नदी वरून ओटवणे गावात येते. त्यामुळे या वीजवाहीनीमध्ये सातत्याने बिघाड होऊन वीजपुरवठा ठप्प होतो. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर मला गावातील वायरमनला कळवावे लागते. मात्र त्यांच्याकडे तीन गावांचा कार्यभार असल्यामुळे विद्युत पुरवठा वेळेत सुरू सुरू होत नाही. याचा फटका शेतकरी व बागायतदारांना बसतो. त्यामुळे या कृषी पंपांना ओटवणे गावातून विजपूरवठा देण्याची शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे.यावेळी सहाय्यक अभियंता सुशांत शिवणे यांनी नवीन वीज वाहिनी टाकण्याबाबत लवकरच सर्वे करून तसा प्रस्ताव मंजुरीसाठी विज वितरण कंपनीसह जिल्हा नियोजन विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी नारायण भानसे, सुधीर गावकर, दाजी भानसे, मोहन भानसे, आबा भानसे, संतोष भानसे, न्हानु भानसे आदी शेतकरी व बागायतदार उपस्थित होते.