...अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवूः इंडिआ आघाडी
शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात इंडिया आघाडीची निदर्शन
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा
कोल्हापूर:
छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रशांत कोरटकर त्याला तातडीने अटक करून कारवाई करावी, अशी मागणी लावून धरण्यात आली. यावेळी सरकार विरोधात देखील घोषणाबाजी करत आंदोलकांनी मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा दिला आहे. तर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सरकारनं गांभीर्याने घेऊन याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यांचा निषेधच केला पाहिजे. जे जे या मार्गावर जात आहेत त्यांना योग्य ते शासन केले पाहिजे, अशी प्रतिक्रीया खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोनवरून कोरटकर धमकी देतात. याबद्दल मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सांगतात, योग्य ती कारवाई व्हावी. पण अद्यापही कोरटकरांना अटक झालेली नाही. हा प्रश्न फक्त कोल्हापूरचा नसून महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. आम्ही इंडिया आघाडी तर्फे ही मागणी करत आहोत, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकरना ताबडतोब अटक करावी. ५ तारखेपर्यंत जर अटक झाली नाही तर ६ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात काळे झेंडे घेऊन मुख्यमंत्र्यांना जाब विचारू अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटाचे नेते विजय देवणे यांनी यावेळी केली.