Miraj: ...अन्यथा शेतकरी सामुदायिक आत्मदहन करणार!
वारंवार मोजणी नोटिसांमुळे मिरजेत शेतकरी संतप्त
मिरज :शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी वारंवार मोजणी नोटीस थांबवा अन्यथा, प्रांत कार्याल्यासमोर सामुदाईक आत्मदहन करू, असा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने देण्यात आला. कृती समितीचे महेश खराडे, सतीश साखळकर यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी समीर दिघे यांना निवेदन दिले आहे.
।
गेली वर्षभर शेतकऱ्यांना वारंवार नोटीस देऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास देणे सुरु आहे. मोजणी नोटीस आल्यामुळे शेतकऱ्यांना वेळ काढून शेतातील कामे थांबवून थांबावे लागत आहे. यात शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयात हजर राहून आमची शेती महामार्गासाठी द्यायची नाही, असे लेखी दिले आहे. याशिवाय पूर्वीच्या तीन मोजणीवेळी गावात आलेल्या मोजणी कर्मचाऱ्यांना तसे लेखी दिले आहे.
तरीही वारंवार त्रास देणे थांबवावे. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांनी सांगली, कोल्हापूर वगळण्याचे सुतोवाच केले आहे. तरीही प्रांतधिकारी दिघे शेतकऱ्यांना नाहक नोटीस देऊन शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. हा त्रास थांबवावा अन्यथा सर्व शेतकरी प्रांत कार्यालय मिरज समोर सामुदाईक आत्मदहन करतील, असा इशारा देण्यात आला.
यावेळी खराडे म्हणाले, शक्तीपीठ महामार्गला कोणत्याही परिस्थितीत शेती द्यायची नाही, असा शेतकऱ्यांचा निर्धार आहे. तसे लेखी प्रांताना दिले आहे. तरीही त्रास देणे सुरु आहे हा त्रास न थांबल्यास याच कार्यालयासमोर शेतकरी आत्म दहन करतील त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल.
यावेळी प्रवीण पाटील, दिनकर साळुंखे पाटील, उमेश एडके, रघुनाथ पाटील, विक्रम पाटील, विष्णु पाटील, अधिक पाटील, बाळासाहेब पाटील व शेतकरी उपस्थित होते.