अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा
बसुर्ते येथील संतप्त शेतकऱ्यांचा बैठकीत इशारा : शेतकरी संघटनेचाही आंदोलनाला पाठिंबा : शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित भरपाई जमा करण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
बसुर्ते गावाच्या शेजारील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीमध्ये शासनामार्फत धरणाच्या कामाला जोरदार शुभारंभ करून सहा महिने उलटले. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले नसल्याने येथील शेतकरी संतप्त झाले असून या शेतकऱ्यांनी गावामध्ये रयत संघटनेची आता स्थापना केली आहे. जर शासनाने तातडीने पैसे जमा केले नाहीत तर बसुर्ते ते बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढून याचा जाब विचारला जाईल, असा इशारा रविवारी बसुर्ते गावामध्ये उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेऊन देण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बसवंत बेनके होते.
बेळगाव जिह्यातील रयत संघटनेचे अध्यक्ष सुरेश परगन्नावर, उपाध्यक्ष राघवेंद्र नाईक यांच्या उपस्थितीत गावातील 200 च्या वर शेतकरी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये बसुर्ते गावाशेजारील असलेल्या सुपीक, पिकाऊ जमिनीमध्ये शासनाने धरणाचे काम हाती घेतले आहे. धरणाच्या कामाला प्रारंभ करताना दोन महिन्यांच्या अवधीतच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे वचन दिले होते. मात्र अद्याप सहा महिने उलटले तरी कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा केले गेले नाहीत. परिणामी येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी बेळगाव जिह्याच्या रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून रयत संघटनेचे पदाधिकारी बसुर्ते गावांमध्ये रविवारी येऊन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये धरणाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून ते आजतागायतचा संपूर्ण आढावा घेण्यात आला.
उग्र आंदोलन छेडू!
यावेळी रयत संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनीही येथील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला असून शासनाने तातडीने त्यांचे पैसे जमा केले नाहीत तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. तसेच सध्या धरणासाठी शेतकऱ्यांची जमीन सपाटीकरण करण्यात आली आहे. आता याच जमिनीत जोंधळ्याचे पीक घेण्यासाठी जोंधळ्याच्या बियाणाची येत्या आठवड्यात पेरणी करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.
या बैठकीमध्ये बसवंत बेनके, नेताजी बेनके, चाळोबा घुमटे, पांडुरंग गोजगेकर, विलास हुबळीकर, अरुण हन्नुरकर यांनी आपली मते मांडली. आणि शेतकऱ्यांचे सध्या काय हाल होत आहेत, गेल्या सहा महिन्यात असलेली पिकेही जमीनदोस्त करून जेसीबीखाली गाडली गेली. आता इथून पुढे शेतकऱ्यांनी कसे जगावे, असा प्रश्न यावेळी मान्यवरांनी मांडला. यावेळी घळगु बेनके, मल्लाप्पा बेनके, केशव नाईक, पुंडलिक मोरे, नागेश डोंगरे, मदन जुवेकर, बाबाजी नवार याबरोबरच गावातील मान्यवर उपस्थित होते.