जीवनविद्या मिशनच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याची कु. श्रद्धा चिले मानकरी
ओटवणे गावची कन्या श्रद्धा चिलेचा मुंबईत सन्मान
ओटवणे | प्रतिनिधी
जीवनविद्या मिशनच्या रविवारी मुंबईत झालेल्या जीवनविद्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ओटवणे गावची कन्या कु श्रद्धा संतोष चिले हिला गौरविण्यात आले.जीवनविद्या मिशनच्या गुणगौरव सोहळ्याची मानकरी ठरल्याबद्दल कु श्रद्धा चिले हिचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.कु श्रद्धा चिले हिने आपल्या अभ्यासाबरोबरच जीवन विद्येचे विचार पण आत्मसात केले. तसेच थोर समाजसेवक व तत्वज्ञ सद्गुरु श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या जीवन विद्येच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने सकारात्मक बदल करून कु श्रद्धा चिले हिने आपल्या जीवनात उत्तुंग शैक्षणिक यश संपादन केल्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचा जिवनविद्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात सन्मान करण्यात आला.जिवनविद्या मिशनचे ट्रस्टी प्रल्हाद ऊर्फ दादा पै यांच्याहस्ते या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थाना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
ग्रामीण भागात शिक्षणाच्या कोणत्याही आधुनिक सोई सुविधा उपलब्ध नसताना फक्त जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर श्रद्धा संतोष चिले हीने याच वर्षी तिहेरी यश संपादन केलं आहे. दहावी परीक्षेत तिने ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिर मधुन ९४. ६० टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच नवोदय विद्यालयच्या परीक्षेत पण तिने चांगले गुण मिळवील्याने तीला ११ वीत नवोदय विद्यालयमध्ये प्रवेश मिळाला आहे. तसेच गायन व हार्मोनियम वादनाचा छंद जोपासत तीने हार्मोनियमच्या चौथ्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले. या सन्मान सोहळ्याबद्दल कु श्रद्धा चिले हिने जीवन विद्या मिशन ट्रस्ट आणि प्रल्हाद ऊर्फ दादा पै यांचे आभार मानले. तसेच आपल्याला आज पर्यंत मार्गदर्शन केलेल्या सर्व शिक्षक आणि विशेषतः दशरथ श्रृंगारे यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.