ऑकलंड स्पर्धेतून ओसाकाची माघार
वृत्तसंस्था/वेलिंग्टन (न्यूझीलंड)
ऑकलंडमध्ये होणाऱ्या एएसबी क्लासीक महिलांच्या टेनिस स्पर्धेतून जपानच्या नाओमी ओसाकाने माघार घेतली आहे. सदर स्पर्धा जानेवारीमध्ये खेळविली जाणार आहे. 2026 च्या टेनिस हंगामातील डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या एएसबी क्लासीक टेनिस स्पर्धेत खेळण्यासाठी नाओमी ओसाकाने गेल्या सप्टेंबरमध्ये आपला होकार दर्शविला होता. पण आता या स्पर्धेत आपण आता सहभागी होऊ शकणार नसल्याचे स्पर्धा संचालक निकोलास लॅम्पेरीन यांना कळविले आहे. जानेवारी होणाऱ्या
ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी आपण सरावावर अधिक भर देत असल्याने ऑकलंड स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याचे ओसाकाने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे 2 ते 11 जानेवारी दरम्यान होणाऱ्या युनायटेट चषक टेनिस स्पर्धेत आपण जपानचे प्रतिनिधीत्व करीत आहे. पर्थमधील स्पर्धेत जपान, ब्रिटन आणि ग्रीस यांचा एकाच गटात समावेश आहे. 2026 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला मेलबोर्न पार्क येथे 18 जानेवारीपासून प्रारंभ होईल.