कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओसाका, स्वायटेक, सिनर, मुसेटी उपांत्यपूर्व फेरीत

06:58 AM Sep 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यूएस ओपन ग्रँडस्लॅम टेनिस :  रुबलेव्ह, कोको गॉफ, अलेक्झांडर बुबलीक पराभूत, व्हीनस महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत

Advertisement

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क

Advertisement

2025 च्या अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीमध्ये इटलीचा टॉपसिडेड जेनिक सिनर, इटलीचाच लॉरेंझो मुसेटी, कॅनडाचा फेलिक्स ऑगर, अॅलियासिमे, ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स डी मिनॉर यांनी तर महिलांच्या विभागात जपानची नाओमी ओसाका, पोलंडची इगा स्वायटेक, झेकची मुचोव्हा यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. दरम्यान, अमेरिकेची कोको गॉफ, रशियाचा आंद्रे रुबलेव्ह, अलेक्झांडर बुबलिक यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अमेरिकेच्या व्हीनस विलियम्सने कॅनडाच्या लैला फर्नांडीससमवेत महिला दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात इटलीच्या जेनिक सिनरने अॅलेक्झांडर बुबलीकचे आव्हान 6-1, 6-1, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. सिनरला या विजयासाठी केवळ 80 मिनिटे झगडावे लागले. जर्मनीतील हॅले येथे जून महिन्यात झालेल्या एटीपी टूरवरील स्पर्धेत बुबलीकने सिनरला पराभूत केले होते. सिनरने अलिकडच्या  कालावधीत ग्रँडस्लॅम स्पर्धेत सलग 25 सामने जिंकले आहेत. या कालावधीत सिनरने गेल्या वर्षी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा तसेच दोनवेळा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे. आता सिनरचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना इटलीच्या लॉरेंझो मुसेटीबरोबर होणार आहे. इटलीच्या मुसेटीने जॉमे मुनारचा 6-3, 6-0, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

अन्य एका सामन्यात कॅनडाच्या 25 व्या मानांकीत फेलिक्स ऑगर अॅलियासिमेने रशियाच्या आंद्रे रुबलेव्हला 7-5, 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का देत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना दोन तास चालला होता. आतापर्यंत अॅलियासिमे आणि रुबलेव्ह यांच्यात दोन सामने झाले होते. ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स डी मिनॉर आणि कॅनडाचा फेलिक्स ऑगर अॅलियासिमे यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल.

गॉफ पराभूत

महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकेच्या टॉपसिडेड कोको गॉफला 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. दुसऱ्या एका सामन्यात पोलंडच्या इगा स्वायटेकने एक्तेरिना अॅलेक्झांड्रोव्हावर 6-3, 6-1 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. जपानच्या ओसाकाने 2021 नंतर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. आता स्वायटेक आणि अमेरिकेची अमांदा अॅनिसिमोव्हा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. झेकच्या मुचोव्हाने कोस्ट्युकवर 6-3, 6-7 (0-7), 6-3 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे. आठव्या मानांकीत अॅनिसिमोव्हाने 16 व्या मानांकीत बियाट्रेझ हदाद माइयाचा 6-0, 6-3 अशा फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. ओसाका आणि मुचोव्हा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडेल.

व्हीनस-लैलाची आगेकूच

महिला दुहेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्स आणि कॅनडाची लैला फर्नांडीस यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. व्हीनस आणि लैला या जोडीने बारावी मानांकित अॅलेक्झांड्रोव्हा आणि चीनची झेंग शुई या तृतिय मानांकीत जोडीचा 6-3, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. आता त्यांची उपांत्यपूर्व लढत टॉपसिडेड जोडी टेलर टाऊनसेंड आणि कॅटरिना सिनीयाकोव्हा यांच्याशी होणार आहे. व्हीनसने यापूर्वी आपली लहान बहीण सेरेना विल्यम्सबरोबर 14 ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये महिला दुहेरीची अजिंक्यपदे मिळविली आहेत.

युकी-व्हीनस उपउपांत्यपूर्व फेरीत

पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांब्री आणि त्याचा न्यूझीलंडचा साथीदार मायकेल व्हीनस यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. युकी आणि व्हीनस या जोडीने कोलंबियाचा इस्कोबार आणि मेक्सीकोचा मिग्वेल रेयेस व्हॅरेला यांचा 6-1, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा सामना 85 मिनिटे चालला होता. युकी आणि व्हीनस या जोडीने पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या गिरॉन आणि तिएन यांचा 6-0, 6-3 असा पराभव केला होता. या स्पर्धेमध्ये भारताच्या रोहन बोपन्ना आणि त्याचा मोनॅकोचा साथीदार अर्मेडो यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. त्याचप्रमाणे भारताचा अर्जुन कढे आणि त्याचा इक्वेडोरचा साथीदार हिडाल्गो यांनाही पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article